उत्तर प्रदेशमध्ये 250 उमेदवार कोट्यधीश

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

"एडीआर' संस्थेचा अहवाल; 110 जणांवर गुन्ह्यांची नोंद, तिसऱ्या टप्प्यासाठी पाहणी

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचार शिगेला पोचला आहे. एकूण 826 उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी 250 उमेदवार कोट्यधीश आहेत, तर 110 जणांवर गुन्हे दाखल असल्याचे "उत्तर प्रदेश इलेक्‍शन वॉच आणि दिल्लीतील असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने अहवालात नमूद केले आहे.

"एडीआर' संस्थेचा अहवाल; 110 जणांवर गुन्ह्यांची नोंद, तिसऱ्या टप्प्यासाठी पाहणी

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचार शिगेला पोचला आहे. एकूण 826 उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी 250 उमेदवार कोट्यधीश आहेत, तर 110 जणांवर गुन्हे दाखल असल्याचे "उत्तर प्रदेश इलेक्‍शन वॉच आणि दिल्लीतील असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने अहवालात नमूद केले आहे.

मोठ्या पक्षांची आघाडी
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सहा राष्ट्रीय पक्ष, सात राज्य पक्ष, 92 मान्यता नसलेल्या पक्षांसह 105 राजकीय पक्षांकडून 826 उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. यात 225 उमेदवार अपक्ष आहेत. "एडीआर'ने 813 उमेदवारांनी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रकांचे विश्‍लेषण केले आहे. त्यात 250 (31 टक्के) उमेदवार करोडपती असल्याचे निदर्शनास आले आहे. बहुजन समाज पक्षाचे 67 पैकी 56, भाजपचे 69 पैकी 61, समजावादी पक्षाचे 59 पैकी 51, कॉंग्रेसचे 14 पैकी सात, तर राष्ट्रीय लोकदलाचे 40 पैकी 13 उमेदवार व 225 अपक्षांमधील 24 उमेदवारांनी एक कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. यातील प्रत्येक उमेदवाराची सर्वसाधारण मालमत्ता 1.61 कोटीच्या घरात असल्याची नोंद अहवालात केली आहे.

धनवान उमेदवार
प्रमुख पक्षांपैकी कॉंग्रेसच्या 14 उमेदवारांची वैयक्तिक संपत्ती सुमारे 6.20 कोटी रुपये असून, भाजपच्या 68 उमेदवारांकडे 3.79, "बसप'च्या 67 उमेदवारांकडे 4.18 कोटी, राष्ट्रीय लोकदलाच्या 40 जणांकडे 73.56 कोटी, समाजवादी पक्षाच्या 59 उमेदवारांकडे 5.70 कोटी, तर 225 अपक्ष 72.25 कोटी रुपयांचे धनी आहेत. यात समाजवादी पक्षाचे अनुपकुमार गुप्ता यांची संपत्ती सर्वाधिक म्हणजे 42 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यांच्यानंतर कॉंग्रेसचे अजय कपूर (31 कोटी), तर समाजवादी पक्षाच्या सीमा सचन (29 कोटी) यांचा क्रमांक लागतो, असे "एडीआर'ने म्हटले आहे. 208 उमेदवारांनी त्यांचा "पॅन'मधील तपशील जाहीर केला नसल्याचे निरीक्षण यात नोंदविले आहे.

पाच जणांचे उत्पन्न सर्वाधिक
प्राप्तिकराच्या परताव्यात नमूद केल्याप्रमाणे पाच उमेदवारांनी त्यांचे उत्पन्न एक कोटीपेक्षा अधिक असल्याचे जाहीर केले आहे. समाजवादी पक्षाच्या अपर्णा यादव यांचे उत्पन्न एक कोटी 97 लाख 61 हजार 490 रुपये असून, त्या प्रथम क्रमांकावर आहेत. याच पक्षाचे अर्शद जमाल सिद्दिकी दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांनी एक कोटी 73 लाख 63 हजार 978 रुपये उत्पन्न दाखविले आहे. "बसप'चे शिवप्रसाद यादव यांची मिळकत एक कोटी 69 लाख 14 हजार 495 रुपये आहे.

82 उमेदवारांवर गंभीर गुन्हे
प्रतिज्ञापत्रांचे विश्‍लेषण केलेल्या 813 मधील 110 (14 टक्के) उमेदवारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, असेही अहवालात म्हटले आहे. यातील 82 उमेदवारांवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, महिलांविरोधातील अत्याचार आदी गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पक्षनिहाय विचार करता भाजपचे 21 उमेदवार, "बसप'चे21, राष्ट्रीय लोकदलाचे पाच, समाजवादी पक्षाचे 13, कॉंग्रेसचे पाच, 13 अपक्ष उमेदवारांनी आपल्यावर गुन्हे दाखल असल्याचे जाहीर केले आहे.

पदवीधारक उमेदवारांची संख्या जास्त
"एडीआर'ने उमेदवारांच्या शैक्षणिक गुणवत्तेचाही आढावा घेतला आहे. 320 उमेदवारांचे शिक्षण पाचवी ते बारावीच्या दरम्यान झाले असून, 418 उमेदवारांनी पदवीपर्यंत किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्याचे प्रतिज्ञापत्रकात जाहीर केले आहे. 43 उमेदवारांनी केवळ शिक्षित असे नमूद केले असून, 10 जण अंगठेबहाद्दर आहेत.

Web Title: Uttar Pradesh: 250 candidates millionaire