भाजपच्या जाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा

वृत्तसंस्था
रविवार, 29 जानेवारी 2017

उत्तर प्रदेशच्या विकासाशिवाय देशाचा विकास अशक्‍य आहे. भाजप कार्यकर्त्यांना यूपीच्या नागरिकाने खुल्या दिलाने आशीर्वाद दिले आहेत. गेल्या पंधरा वर्षांत यूपी पिछाडीवर गेले आहे. यंदा भाजपचे सरकार येईल. आम्ही कौटुंबिक आणि जातीचे राजकारण कधीही केले नाही. आम्ही तत्त्व अणि विकासासाठी राजकारण केले आहे. यूपीत घराणेशाहीचा अंत होईल. 
- अमित शहा, भाजप अध्यक्ष

नवी दिल्ली / लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा जिंकण्यासाठी कंबर कसलेल्या भाजपने आपल्या जाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केला आहे. मोफत लॅपटॉपबरोबरच एक जीबी इंटरनेट मोफत, वायफाय सुविधा, तोंडी तलाकसंदर्भात राज्यातील महिलांचे मत जाणून घेणार यासारख्या मुद्‌द्‌यांचा जाहीरनाम्यात समावेश आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात यूपीच्या विकासाबाबत नऊ बाबींचा उल्लेख केला आहे. त्यात महिलांची सुरक्षा, युवकांना रोजगार आणि शेतकऱ्यांना सुविधा याबाबत काळजी घेतली आहे. 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पक्षाने पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याला "लोककल्याण संकल्प पत्र' असे नाव दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तर प्रदेशमध्ये दोनतृतीयांश बहुमत मिळण्याचा दावा केला असून, राज्यातील दहा कोटींहून अधिक नागरिकांशी संवाद साधल्याचे नमूद केले आहे. राम मंदिर उभारणीसाठी कायदेशीर बाबी पाहिल्या जातील असे सांगून, घटनेच्या चौकटीतच उभारणी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात 16 हजार किलोमीटरची परिवर्तन यात्रा पूर्ण केल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत उत्तर प्रदेश "बिमारू सूची'तून बाहेर येत नाही, तोपर्यंत विकास होणार नाही. ज्या ठिकाणी भाजप सरकार स्थापन झाले, ते राज्य विकासाकडे वाटचाल करत असल्याचा दावा शहा यांनी केला. या वेळी उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य आणि योगी आदित्यनाथ यांची प्रमुख उपस्थिती होती. 

"लोककल्याण संकल्प'चे ठळक मुद्दे 
कायदेशीर बाबी तपासून लवकरच राम मंदिर उभारणी 
सहा शहरांत हेलिकॉप्टर सेवा 
यूपीत 25 नवीन वैद्यकीय महाविद्यालये 
पाच वर्षांत प्रत्येक घरात चोवीस तास वीज 
कानपूर, गोरखपूरमध्ये मेट्रो 
नोईडा आणि लखनौत मेट्रो विस्तार 
मजुरांना दोन लाखांपर्यंत मोफत विमा 
कॉलेजमध्ये मोफत वाय-फाय 
प्रत्येक युवकाला लॅपटॉप 
जनावरांचे बेकायदा कत्तलखाने बंद 
पदवीपर्यंत मोफत शिक्षण 
सर्व घरांत एलपीजी कनेक्‍शन 
गरिबांना तीन रुपये प्रति युनिट दराने वीज 

उत्तर प्रदेशच्या विकासाशिवाय देशाचा विकास अशक्‍य आहे. भाजप कार्यकर्त्यांना यूपीच्या नागरिकाने खुल्या दिलाने आशीर्वाद दिले आहेत. गेल्या पंधरा वर्षांत यूपी पिछाडीवर गेले आहे. यंदा भाजपचे सरकार येईल. आम्ही कौटुंबिक आणि जातीचे राजकारण कधीही केले नाही. आम्ही तत्त्व अणि विकासासाठी राजकारण केले आहे. यूपीत घराणेशाहीचा अंत होईल. 
- अमित शहा, भाजप अध्यक्ष

Web Title: Uttar Pradesh Election 2017: Amit Shah launches BJP manifesto; revives Ram Mandir agenda, talks development