यादवांच्या आखाड्यात विरोधकांची कोंडी

पीटीआय
बुधवार, 18 जानेवारी 2017

कधीकाळी मायावती यांनी सत्तेत येण्यासाठी भाजपची मदत घेतली होती, त्यांचा हा इतिहास पाहता त्यांना एकगठ्ठा मुस्लिम मते मिळणे अवघड मानले जाते. मुस्लिम मतांचे विभाजन हे भाजपच्या पथ्यावर पडू शकते

लखनौ - समाजवादी पक्षातील अंतर्गत संघर्षात अखेर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची सरशी झाल्याने राज्यातील सर्व राजकीय गणितेच बदलली आहेत. या बदलाचा दूरगामी परिणाम राज्याच्या राजकारणावर झाला आहे. ताज्या दमाच्या अखिलेश यांच्या सैन्याला तोंड देण्यासाठी भाजप आणि बहुजन समाज पक्षाला आपली रणनीती बदलावी लागणार आहे. महाआघाडीमुळे कॉंग्रेसच्या अंगी मात्र दहा हत्तींचे बळ आले आहे. समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेसच्या महाआघाडीने मुस्लिम मतांवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. मुस्लिमांची एकगठ्ठा मते या दोन्ही पक्षांना मिळाल्यास भाजपचा पराभव अटळ मानला जातो. राज्यातील मुस्लिमांची 20 टक्के मते टर्निंग पॉइंट ठरणार आहेत. अखिलेश यांच्या चेहऱ्याकडे पाहून मुस्लिम मते समाजवादी पक्षाकडे वळू शकतात.

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मुस्लिमांची मते डोळ्यांसमोर ठेवूनच 97 मतदारसंघांतून मुस्लिम उमेदवार दिले आहेत. कधीकाळी मायावती यांनी सत्तेत येण्यासाठी भाजपची मदत घेतली होती, त्यांचा हा इतिहास पाहता त्यांना एकगठ्ठा मुस्लिम मते मिळणे अवघड मानले जाते. मुस्लिम मतांचे विभाजन हे भाजपच्या पथ्यावर पडू शकते.

मुस्लिम समाज ही समाजवादी पक्षाची हक्काची व्होटबॅंक मानली जाते. दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी, लखनौमधील "दारूल उलूम नदवातून'चे उलेमा मौलाना सलमान नादवी या दोघांचा समाजवादी पक्षातील संघर्ष मिटविण्यात सिंहाचा वाटा होता. पक्षातील संघर्ष मिटला नाही तर मुस्लिमांची मते "बसप'कडे वळतील, असे दोघांनी आधीच नेताजींना सांगितले होते.

यादव आणि मुस्लिमांमधील एक मोठा गट मुलायमसिंह यांच्या पाठीशी असला तरीसुद्धा, बहुतांश सामान्य मुस्लिम आणि यादव हे अखिलेश यांचाच पर्याय निवडतील यात शंका नाही. मागील पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि प्रशासनावरील हुकूमत या अखिलेश यांच्या जमेच्या बाजू आहेत. समाजवादी पक्षाचा आक्रमक चेहरा असलेले अखिलेश हे सध्या तरी तरुणांच्या पसंतीस उतरले आहेत.

विरोधकांची संधी गेली
निवडणूक आयोगाने अखिलेश यांच्या बाजूने निकाल दिल्याने भाजप आणि बहुजन समाज पक्ष या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांची कुरघोडी करण्याची संधी हुकली आहे. दलित आणि मुस्लिम यांना एकत्र करून बाजी मारण्याचा बहुजन समाज पक्षाचा विचार होता. सर्वाधिक संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्‍चिम उत्तर प्रदेशात बसपची खरी लढत भाजपशी असल्याचे मानले जात होते, पण ऐन वेळी सगळी गणितेच बदलली.

शुक्‍ला, पूनावालांच्या प्रयत्नांना यश
उत्तर प्रदेशात महाआघाडी व्हावी म्हणून कॉंग्रेसमधील उच्चपदस्थ नेत्यांची एक मोठी फळी काम करत होती. कॉंग्रेसचे नेते राजीव शुक्‍ला, तेहसीन पूनावाला यांनी या अनुषंगाने अखिलेश यादव यांच्या अनेकदा भेटीही घेतल्या होत्या. खुद्द अखिलेश यांनी शिवपाल यादव आणि नेताजींचा विरोध डावलून कॉंग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी दर्शविली होती.

Web Title: Uttar Pradesh on election mode