कोविंद यांच्या गावात विजयोत्सव

ramnath kovind
ramnath kovind

गाणे, नृत्य, रामकथा; कुटुंबात आनंदी वातावरण

कानपूर देहात : देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड गुरुवारी झाली आणि त्यांच्या मूळ गावी उत्तर प्रदेशमधील परौख व नातगल राहतात त्या झिनझॅक गावात (जि. कानपूर देहात) एकच जल्लोष सुरू झाला. गाणी, नृत्य, ढोलवादनाने कोविंद यांच्या विजयाचे स्वागत करण्यात आले.

झिनझॅक गाव तुपाच्या दिव्यांनी झळाळून निघाले होते. रामनाथ कोविंद यांचे ज्येष्ठ बंधू प्यारेलाल कोविंद (वय 76) यांच्या कुटुंबाचा आनंद अवर्णनीय होता. प्यारेलाल यांच्या मालकीचे येथे छोटे कापडाचे दुकान आहे. त्यापूर्वी ते हातगाडी चालवत होते. रामनाथ कोविंद यांना चार भाऊ आहेत. ते सर्वांत लहान आहेत. झिनझॅक गावातील ओमनगर परिसरात सर्व भावांची घरे शेजारी-शेजारी आहेत. या सर्व कुटुंबांतील सदस्य एकत्र येऊन कोविंद यांचा विजयोत्सव साजरा करण्यात आज दंग झाले होते. डीजेच्या साथीत भोजपुरी गाण्यांवर नृत्याचा कार्यक्रम तेथे रंगला होता. पाहुण्यांचे स्वागत गुलाल व फुले देऊन केले जात होते. मिठान्नाची रेलचेल होती. कोविंद यांनी दिलेल्या आमंत्रणावरुन त्यांचे नातलग शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी ते रेल्वेने रविवारी (ता.23) दिल्लीला जाणार आहे. त्यासाठी त्यांनी नवीन कपड्यांची खरेदीही सुरू केली आहे.

परौख हे कोविंद यांचे मूळ गाव आहे. तेथेही गावकऱ्यांनी त्यांचा विजय साजरा करण्यात आला. "नाच लेने दे मैनू, नाच लेने दे... बाबा की बनी सरकार, की आज मैनू नाच लेने दे' हे स्वरचित गाणे दोन गावकरी आनंदाने गात होते. त्यापैकी एक जण हार्मोनियम वाजवत होता. गावातील युवक व कोविंद यांचे जुने मित्रही या आनंदात सहभागी झाले होते. कोविंद यांनी गावात बांधलेल्या समाज मंदिरातही त्यांच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यात येत होता. कोविंद यांच्या आई-वडिलांचे घर ज्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी हे समाज मंदिर बांधले आहे. आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी देशाच्या सर्वोच्च स्थानी पोचला असल्याचा आनंद तेथील प्राथमिक शाळेतही ओसंडून वाहत होता. कोविंद यांच्या विजयानिमित्त तेथे रामायण कथेचे आयोजन केले होते. "आता आमचे गाव जगाच्या नकाशावर आले आहे. हे कोविंद यांच्यामुळे घडले. आता गावात चांगले रस्ते तयार होतील. शिवाय, आम्हाला आमचे महाविद्यालय मिळेल,'' अशी अपेक्षा कोविंद यांचे मित्र गौरीशंकर श्रीवास्तव यांनी व्यक्त केली.

मोफत पाणीपुरीवाटप
झिनझॅक गावात कोविंद यांच्या शेजारी पवन नावाचा पाणीपुरी विक्रेता राहतो. "पवन बताशावाला' ही त्याची पाणीपुरीची गाडी परिसरात लोकप्रिय आहे. आपल्या शेजारील कोविंद यांच्या कुटुंबातील व्यक्ती राष्ट्रपतिपदावर विराजमान होणार आहे याचा आनंद त्यालाही झाला आहे. ""कोविंद यांच्याशी माझी वैयक्तिक ओळख नाही; पण ते ज्या दिवशी राष्ट्रपतिपदाची शपथ घेतील, त्या दिवशी दिवसभर मी पाणीपुरी मोफत वाटणार आहे,'' असे त्याने जाहीर केले.

कोविंद "रबर स्टॅम्प' बनणार नाहीत, याची खात्री मी तुम्हाला देतो. त्यांना त्यांचे स्वतंत्र विचार आहेत. आपल्या कामात इतरांनी हस्तक्षेप केलेला किंवा दुसऱ्याच्या मतानुसार वागणे त्यांना आवडत नाही.
- प्यारेलाल कोविंद

राष्ट्रपतीपदासाठी काकांचे नाव जाहीर झाले तेव्हा ते मोठ्या फरकाने निवडून येतील याची आम्हाला खात्री होती. आता निकाल जाहीर झालाच आहेच. देशातील सर्वोच्च स्थानी त्यांची निवड झाली याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या आनंद गगनात मावत नाही. आम्ही दिवसभर त्यांचा विजय साजरा केला. सायंकाळी आम्ही खास आतषबाजीचा कार्यक्रमही आयोजित केला होता. लहानपणी ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळले ते काका आज देशाचे राष्ट्रपती झाले ही गोष्ट स्वप्नवत वाटते. आमचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गावाने आज होळी व दिवाळी साजरी केली.
- हेमलता कोविंद, रामनाथ कोविंद यांची पुतणी व शिक्षिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com