पोलिस स्थानक झाले काही वेळासाठी लग्नमंडप 

वृत्तसंस्था
सोमवार, 26 मार्च 2018

'दोघेही सज्ञान असल्याने त्यांनी आमच्याकडे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दोघेही लग्नासाठी तयार असल्याने आम्ही व इतर सहकाऱ्यांनीही या लग्नास पाठिंबा दिला व लग्नाची सर्व तयारी केली. अशाप्रकारे त्यांचे लग्न लावून देण्यात आले, असे मोहम्मदपूर खाला पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक दिगंबर कुशवाह यांनी सांगितले.

बाराबंकी (उत्तरप्रदेश) : येथील बाराबंकीमधील पोलिस स्थानकामध्ये एक अनोखे लग्न पार पडले. या लग्नात पोलिसांनी पूर्ण पाठिंबा दर्शवून जोडप्याच्या लग्नासाठी सर्वतोपरी मदत केली. 

बाराबंकी येथील विनय कुमार व नेहा वर्मा या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते, पण घरच्यांच्या विरोधामुळे त्यांना लग्न करण्यास अडथळा येत होता. त्यामुळे हे दोघे पळून गेले. शोध घेतल्यावरही दोन दिवसांपासून ते कुठेच सापडले नाहीत म्हणून, दोघांच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. अखेरीस पोलिसांना विनय व नेहा सापडले. 

'दोघेही सज्ञान असल्याने त्यांनी आमच्याकडे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दोघेही लग्नासाठी तयार असल्याने आम्ही व इतर सहकाऱ्यांनीही या लग्नास पाठिंबा दिला व लग्नाची सर्व तयारी केली. अशाप्रकारे त्यांचे लग्न लावून देण्यात आले, असे मोहम्मदपूर खाला पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक दिगंबर कुशवाह यांनी सांगितले. पालकांनीही पोलिसांनी लावून दिलेल्या लग्नावर आक्षेप घेतला नाही व लग्नासाठी परवानगी दिली. 

पोलिस स्थानकाची एक खोली फुलांनी सजवण्यात आली. जेवणही ठेवले. विशेष म्हणजे पोलिसांनी नवरदेवासाठी घोडीही ठेवली होती. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने वाजतगाजत नवरदेवाची वरात आली. दोघांच्या घरच्यांनी काही वेळासाठी का होईना, चेहऱ्यावर हास्य ठेवले होते. अशाप्रकारे हो लग्नसोहळा पोलिसांनी यशस्वीरित्या पूर्ण केला.    
      

Web Title: In Uttar Pradesh, Wedding In A Police Station As Cops Play Cupid For This Couple