भाजप नेता म्हणतो, 'हे' पाणी प्या आणि सिझेरियन टाळा

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जुलै 2019

उत्तराखंडमधील भाजप खासदार अजय भट यांनी हा अजब सल्ला दिला आहे. लोकसभेच्या अधिवेशनात होमिओपॅथी सेंट्रल काउन्सिल विधेयकाविषयी बोलत असताना भट यांनी हा दावा केला आहे.

डेहराडून : सत्तेत आल्यापासून बेताल वक्तव्ये करणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये आता आणखी एक भाजप नेत्याची भर पडली असून, त्याने सिझेरियन टाळण्यासाठी गरुड गंगा नदीचे पाणी प्या, असा अजब सल्ला दिला आहे.

उत्तराखंडमधील भाजप खासदार अजय भट यांनी हा अजब सल्ला दिला आहे. लोकसभेच्या अधिवेशनात होमिओपॅथी सेंट्रल काउन्सिल विधेयकाविषयी बोलत असताना भट यांनी हा दावा केला आहे.

भट यांच्या म्हणण्यानुसार, खूप कमी जणांना गरूड गंगा या नदीचं वैद्यकीय महत्त्व माहिती आहे. काकडीघाट येथे राहणाऱ्या एका माणसाने घरात साप घुसल्याचं मला (भट यांना) सांगितलं होतं आणि माझ्याकडे मदत मागितली होती. तो माणूस कुटुंबासह घराबाहेर राहत होता कारण त्याला सर्पदंशाची भीती वाटत होती. मी त्याला गरूड गंगा नदीत मिळणारे गोटे घरात ठेवायला सांगितले. त्याने माझा सल्ला ऐकला आणि चमत्कार म्हणजे सापही त्याच्या घरातून निघून गेला. या नदीत मिळणारे गोटे आणि नदीचं पाणी अतिशय गुणकारी असून दोन गोटे एकमेकांवर घासून ते नदीच्या एक कप पाण्यात मिसळून जर ते पाणी गर्भवती महिलेला दिले तर तिची सिझेरियन प्रसुतीपासून सुटका होऊ शकते. तसेच या नदीत मिळणारे गोटे सर्पदंश झालेल्या ठिकाणी घासले तर विष बाधत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttarakhand BJP chief Ajay Bhatt says Drink river water avert C sec