उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 22 भाविकांचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 24 मे 2017

मध्य प्रदेशातील इन्दूर येथील भाविक देवदर्शनासाठी गंगोत्री येथे गेले होते. उत्तरकाशी येथून 25 किमी अंतरावर असलेल्या नलूपानी येथे बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस 300 मीटर दरीत कोसळली.

उत्तरकाशी - गंगोत्री येथून देवदर्शन करून येत असताना नालूपानी येथे भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इन्दूर येथील भाविक देवदर्शनासाठी गंगोत्री येथे गेले होते. उत्तरकाशी येथून 25 किमी अंतरावर असलेल्या नलूपानी येथे बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस 300 मीटर दरीत कोसळली. काही भाविक भागीरथी नदीत कोसळले. या अपघातात 22 जणांचा जागीच मृत्यू झाला. आठ जण जखमी असून, त्यांना चिन्यालीसौड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इन्दूर येथील एकूण 57 भाविक गंगोत्री येथे गेले होते. तेथून दोन बसमधून ते परतत होते. मात्र, यातील एक बस दरीत कोसळली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष रामसुंदर नौटीयाल यांनी या अपघाताची माहिती जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास बचाव पथक घटनास्थळी पोहचले. अपघाताच्या ठिकाणी तीव्र उतार असल्याने बचावपथकाला भागीरथी नदीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बचावकार्य करावे लागले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी अपघाताची माहिती मिळताच दुःख व्यक्त केले. तसेच त्यांनी मृत्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख आणि जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली. 

Web Title: uttarkashi 22 die as mini bus roll down in gorge at uttarkashi