"भारत कन्या' उझमा परतली

पीटीआय
शुक्रवार, 26 मे 2017

वाघा सीमेवरून मायदेशात प्रवेश; स्वराज यांच्याकडून स्वागत
 

नवी दिल्ली : बंदुकीचा धाक दाखवून पाकिस्तानमध्ये बळजबरीने विवाह झालेली भारतीय युवती उझमा (वय 20) आज भारतात परतली. "भारत कन्ये'चे स्वागत आहे, असे ट्‌विट करत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी तिचे आज स्वागत केले. तिला पाकिस्तानात सहन कराव्या लागलेल्या त्रासाबद्दल त्यांनी दु:खही व्यक्त केले.

उझमाच्या पतीने तिचा पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे ताब्यात घेतल्याने भारतात परतण्याची परवानगी मागणारी याचिका उझमाने इस्लामाबाद उच्च न्यायालयात केली होती. ही याचिका न्यायालयाने मंजूर केल्यामुळे उझमा आज तातडीने भारतात आली. भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी आणि पाकिस्तानी पोलिसांनी तिला वाघा सीमेवर आणून सोडले. येथून तिने भारतात प्रवेश केला. भारतात प्रवेश केल्यावर तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

1 मे रोजी पाकिस्तानातील खैबर-पख्तुन्वा येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेलेल्या उझमाचा दोनच दिवसांनी ताहीर अहमद या व्यक्तीबरोबर बंदुकीचा धाक दाखवून विवाह लावून देण्यात आला होता. त्यानंतर इस्लामाबादला आलेल्या उझमाने तातडीने भारतीय उच्चायुक्तालयात आश्रय घेत मदतीची विनंती केली होती. ताहीरनेही आपल्या पत्नीला ताब्यात देण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, आपला हा विवाह बळजबरीने झाला असून, पहिल्या विवाहापासून झालेली मुलगी भारतात आजारी असल्याचे उझमाने न्यायालयात सांगितले होते. तसेच ताहीरने कागदपत्र ताब्यात घेतल्याने त्याशिवाय भारतात परतण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर उझमाला भारतात परतण्याची परवानगी दिली. तिच्या विवाहाबाबत अद्यापही निकाल लागला नसून, तिच्या वतीने इस्लामाबाद न्यायालयात तिचे वकील बाजू मांडतील.

भारत सरकारचे आभार
पाकिस्तानात अडकलेली उझमा इतक्‍या लवकर सुखरूप भारतात परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. उझमाच्या परतण्याबाबत सुषमा स्वराज यांच्याकडून माहिती मिळाली होती, असे तिचा भाऊ वासिम अहमद याने सांगितले. भारत सरकारने तातडीने केलेल्या हालचालीमुळेच हे शक्‍य झाल्याचे सांगत त्याने स्वराज आणि भारत सरकार यांचे आभार मानले.

पाकिस्तान हा मृत्यूचा सापळा आहे. येथे महिलाच नाही, तर पुरुषही असुरक्षित आहेत. पाकिस्तानात महिलांचे अतोनात हाल होत असून त्यांना फसविले जाते.
- उझमा, पाकमधून परतलेली युवती

Web Title: uzma returned home india from pakistan