भारतीय कन्येचे स्वागत आहे: सुषमा स्वराज

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 मे 2017

पाकिस्तानी व्यक्तीशी जबरदस्तीने विवाह करण्यास भाग पाडल्याचा आरोप केलेल्या उझ्मा (वय 20) या भारतीय युवतीस भारतात परतण्यास पाकिस्तानमधील इस्लामाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी दिली होती.

नवी दिल्ली - पाकिस्तानमधून भारतात परतलेली भारताची कन्या उझ्मा हिचे स्वागत आहे. तुला आतापर्यंत सहन कराव्या लागलेल्या त्रासाबद्दल माफी मागते, असे भावनिक ट्विट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे. 

पाकिस्तानी व्यक्तीशी जबरदस्तीने विवाह करण्यास भाग पाडल्याचा आरोप केलेल्या उझ्मा (वय 20) या भारतीय युवतीस भारतात परतण्यास पाकिस्तानमधील इस्लामाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी दिली होती. आज (गुरुवार) सकाळी उझ्मा भारतात वाघा सीमेवरून दाखल झाल्या. त्यांनी भारतात पाय ठेवताच भारतीय भूमीला स्पर्श केला. 

न्या. मोहसीन अख्तर कयानी यांच्या खंडपीठाने उझ्माला तिचा मूळ इमिग्रेशन अर्ज परत केला. पती ताहीर अली याने हा अर्ज न्यायालयाकडे दिला होता. उझ्मा भारतात जाताना तिला वाघा सीमेपर्यंत सुरक्षा पुरविण्याचा आदेशही न्यायालयाने दिला होता. या निर्णयानंतर उझ्माची खासगी भेट घेण्याची इच्छा ताहीरने व्यक्त केली होती. न्या. कयानी यांनी त्यांच्या कार्यालयात भेटण्यास सांगितले. मात्र, उझ्माने या भेटीस नकार दिला. बंदुकीचा धाक दाखवून ताहीरच्या निकाहनाम्यावर जबरदस्तीने सही करण्यास भाग पाडल्याचा दावा करीत उझ्माने उच्च न्यायालयात सहा पानी लेखी जबाब दिला होता.

Web Title: Uzma, Welcome home India's daughter says Sushma Swaraj