निवडणुकीसाठी वाजपेयींच्या नावाचा वापर ; वाजपेयींची पुतणीचा आरोप

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

''पंतप्रधान नरेंद्र मोदीही 14 ऑगस्टला एम्समध्ये वाजपेयींच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर लाल किल्ल्यावरील त्यांच्या भाषणात वाजपेयींच्या नावाचा उल्लेख केला. हे सर्व निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केले जात आहे. या प्रकारामुळे मी अत्यंत व्यतिथ झाले''.

- करूणा शुक्ला, वाजपेयींची पुतणी

नवी दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी केला जात आहे, असा आरोप वाजपेयींची पुतणी करूणा शुक्ला यांनी आज (गुरुवार) केला. रायपूरचे नाव अटलनगर केल्यानंतर त्यांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करण्यात येऊ नये. याबाबतचा संदेश करुणा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. 

येत्या काही महिन्यात चार राज्यांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या प्रचारसभांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि रमणसिंह यांच्याकडून अटलबिहारी वाजपेयींच्या नावाचा वापर केला जात आहे. रमणसिंह यांनी वाजपेयींचे नाव कधीही घेतले नाही. मात्र, आता ते त्यांचे नाव घेत आहेत. वाजपेयींचे नाव घेण्याऐवजी त्यांनी दाखविलेल्या मार्गाने चालले असते तर अधिक चांगले झाले असते.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही 14 ऑगस्टला एम्समध्ये वाजपेयींच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर लाल किल्ल्यावरील त्यांच्या भाषणात वाजपेयींच्या नावाचा उल्लेख केला. हे सर्व निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केले जात आहे. या प्रकारामुळे मी अत्यंत व्यतिथ झाले, असे शुक्ला म्हणाल्या. 

दरम्यान, वाजपेयींची पुतणी करुणा सध्या काँग्रेस पक्षात असून, त्या छत्तीसगड काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

Web Title: Vajpayees name should be used for elections says Vajpayees niece