"वरदाह' आज आंध्र,तमिळ किनारपट्टीस धडकणार

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

"वरदाह'मुळे या भागात दुपारी 2.30 ते 5.30 पर्यंत अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर येथील शेतकरी काळजीत पडले आहेत. वादळामुळे या भागामधील भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.

चेन्नई - वरदाह या सागरी वादळाची तीव्रता आणखी वाढली असून आज (सोमवार) दुपारपर्यंत उत्तर तमिळनाडू व दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीस हे वादळ येऊन धडकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या वादळामुळे मुसळधार वृष्टीबरोबरच ताशी 80 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा भारतीय वेधशाळेने दिला आहे.

सध्या हे वादळ तमिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईपासून 100-120 किमी अंतरावर आहे. "वरदाह'मुळे या भागात दुपारी 2.30 ते 5.30 पर्यंत अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता असल्याची माहिती एस बी थंपी या संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे. या भागात आत्तापर्यंत सहा सेंमी पाऊस पडला आहे. चेन्नईमधील विविध भागांत पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. चेन्नई शहरास याआधी 1994 मध्ये वादळाचा फटका बसला होता.

या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर या भागात धावणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या भागामध्ये मासेमारी करणारे मच्छिमार हे पुन्हा किनाऱ्यावर परतले आहेत. किनारपट्टीवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून या भागामध्ये प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर येथील शेतकरी काळजीत पडले आहेत. वादळामुळे या भागामधील भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.

या नैसर्गिक संकटाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तुकड्या आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यांत पाठविण्यात आल्या आहेत.

Web Title: 'Vardah' now a severe cyclonic storm