blog
blog

हे घरची माझे विश्व

हे घरची माझे विश्व

अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम
उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम

हा आपला बंधू आहे व तो आपला बंधू नाही, या प्रकारची वर्गवारी कोत्या मनाचे लोक करतात, पण उदार ऋदय असलेल्या लोकांसाठी सारे विश्वच एक कुटुंब आहे. महोपनिषिधातील चौथ्या अध्यातील 71 वा हा श्लोक, पृथ्वी, विश्व हे एक मोठे कुटुंबच आहे, असे सुचवितो. यावरूनच विश्वची माझे घर, अशीही एक संकल्पना आहे.  दोन्ही संकल्पनांचा आपण वारंवार उल्लेख करीत आलोय. कल्पनेच्या स्तरावर ते खरे असले, करोनाच्या काळात त्या उक्तींच्या अगदी  उलट म्हणजे, हे घरची माझे विश्व, झाले आहे. आपला दृष्टीकोन सध्या तरी आपल्या घरापुरता मर्यादित झाला आहे. जग व समाजाचा विचार करण्यापेक्षा आपण घराचा, घरातील माणसांचा, त्यांच्या तब्येतीचा विचार करू लागलो, त्यांची काळजी घेऊ लागलो. 

एका मागून एक आलेले लॉकडाऊन, नंतर आलेले अनऑकडाऊन, कुठे शिथील, तर कुठे कडक. त्यामुळे देशातील वातावरण गोंधळलेले आहे. राज्याराज्यांतील सरकारे परिस्थितीप्रमाणे तसेच, आवश्यकता व सोईनुसार नियम बदल करीत आहेत. त्यात भर पडत आहे, ती कोविड-19च्या नावाखाली पोलिसांतर्फे होणाऱ्या नियमांच्या जाचक अंमलबजावणीची. त्यामुळे सामान्य माणूस जेरीस न आला, तरच नवल. त्याचे पडसाद रोज आपल्याला वृत्तपत्रांतून, निरनिराळ्या वाहिन्यांवरून वाचावयास व पाहावयास मिळतात. एकीकडे करोना वॉरियर्स (डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णालायातील कर्मचारी) जेरीस आले, तर रुग्णही करोनाविरूद्ध लढा देत आहेत. करोनाचा फटका सर्वाधिक बसलाय तो व्यापार, उद्योगाला, रोजच्या मजुरीवर पोट भरणाऱ्याला.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आत्मनिर्भरतेच्या आवाहनला प्रतिसाद देऊन प्रत्येक कुटुंब स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करीत आहे. घरगडी अथवा मोलकरीण नोकरीला ठेवण्याएवजी घरातील प्रत्येकाने काही न काही काम वाटून घेतले असून, लाकडाऊनच्या चार महिन्यांच्या काळात ते आता इतके अंगवळणी पडले आहे, की पुन्हा कुणाला कामाला ठेवण्याचा विचार मनात येत नाही. शिवाय कामाला ठेवले, तरी मोलकरीण अथवा घरगडी यांच्याद्वारे करोना घरात प्रवेश तर करणार नाही, अशी दाट भयशंका येते. त्यामुळे जितके रेटता येईल, तेवढे रेटण्याकडे कल दिसतोय. 

सगळ्यांत पंचाईत आहे, ती चिमुकल्या मुलांची. या आधी त्यांना त्यांची खेळणी असलेल्या उद्यानात आपण घेऊन जाऊ शकत होतो. निदान गेले चार महिने ते थांबलेले आहे. अजून किती महिने थांबावे लागेल, याचा अंदाज आपण करू शकत नाही. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी इन्टरनेटवरून ऑनलाईन शिक्षणाचा नवा प्रकार सुरू झालाय. त्यातून मुले व पालक यांच्यातील ताण काही प्रमाणात वाढलाय. शिवाय, घरातून (वर्क फ्रॉम होम) काम करण्याची नवी पद्धत सर्वांनाच रुचते, असे नाही. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांबरोबर जसे काम, गप्पा व हास्यविनोदामध्ये वेळ जात असे, ते अशक्य झाले आहे. घरामध्येही तेच ते चेहरे समोर दिसल्याने सुसंवादापेक्षा अधून-मधून विसंवादच होतो. 

विमान, रेल्वे वाहतूक पूर्ववत न झाल्याने पर्यटन ठप्प पडले आहे. सभासमारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, सिनेमागृहे, रेल्वे, मेट्रो, ह्ऑटेल्स व बव्हंशी रेस्टारंट्स बंद आहेत. केवळ पुणेकरांनाच नव्हे, तर तमाम भारतीयांना बाहेर खाण्याची इतकी सवय लागली आहे की, काही रोज बाहेर खाणारे, तर, आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा बाहेर भोजनादी करणारे आहेत. त्यांना आपल्या सवई मोडाव्या लागल्या. अर्थात, त्यातून पैशाची बचत झाली व होत आहे, हे ही नसे थोडके.  
 
सिंगापूर हे असे एक शहर व देश आहे, की तेथे 90 टक्क्यांपेक्षा अधिक नागरीक घरी जेवण बनवित नाही. प्रत्येक गृहसंकुलाच्या पायथ्याशी एक भव्य रेस्टारंट असते. घरातून कामाला निघण्यापूर्वी जो तो त्या रेस्टारंटमध्ये न्याहारी करतो व कामाला जातो. दुपारचे जेवण ऑफिसनजिकच्या रेस्टारंटमध्ये, तर घरी परतताना प्रथम इमारतीच्या पायथ्याशी असलेल्या त्याच रेस्टारंटमध्ये रात्रीचे जेवण करावयाचे व नंतर घरात पाऊल ठेवायचे, अशी प्रथा. त्यात करोनामुळं काही खंड पडला, परंतु, करोना जसा इतर देशात फोफावला, तितका तो सिंगापूरमध्ये न पसरल्याने नागरिकांना रोजचे व्यवहार करताना फारशा अडचणी येत नाहीत.  

करोना कसा लाभदायक ठरतोय, याचा विचार केल्यास दिसून येते की, श्रीम्दभगव्तगीतेत म्हटल्याप्रमाणे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या षड्रिपूंवर काही प्रमाणात ताबा मिळविण्यास त्याचा फायदा झालाय, असे म्हणावे लागेल. बाजारपेठा, माल्स आदी बंद असल्याने शापोहेलिकांची खिसेगळचेपी झाली. तर, बहुसंख्य आता केवळ विंडोशापिंग करीत आहेत. कारण, पगारांची रक्कम निम्मी झाल्याने कपडे, बूट, सौंदर्य प्रसाधने, स्टायलिश कपडे आदी खरेदी करणे जवळजवळ बंद झाले आहे. सर्वाधिक खर्च होतोय, तो केवळ रोज लागणाऱ्या दूध, किराणामाल, भाज्या, फळफळावळ या अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीवर. म्हणजे, आपोआपच लोभ व मोह हे दोन षड्रिपू मागे पडलेत, किंबहुना काबूत आलेत. आपण काटकसर शिकलो. घरातली व्यक्ती अगदीच आळशी असेल, तर घरकाम करणाऱ्या अन्य व्यक्तींना त्याचा किंवा तिचा मत्सर वाटणे सहाजिक. परंतु, सारा समाज एकाच तर्हेने पुढे जात असल्याने सामाजिक मत्सरता सहसा कुठे दिसत नाही. मद म्हणजे आळस. अर्थात घरात बसायचा आळस सर्वांनाच आलाय हे खरं. परंतु, आळस न करता आपल्या शारिरिक स्वाथ्य व आरोग्यासाठी लोक योगाभ्यास, अन्य घरगुती व्यायाम करू लागलेत. घरात बसल्यास करोनापासून बचाव होईल, याची जाणीव प्रत्येकाला झाली आहे. 

राहता राहिले काम व क्रोध हे षड्रिपू. कोरनाच्या काळात शृंगारावर बंधन नसले, तरी मुखपट्टी व सामाजिक विलगीकरणामुळे रोमान्स, डेटींग हे बहुतांशी मोबाईल व इंटरनेटपुरते मर्यादित झाले आहे. व्हर्चुअल विवाह होत आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे, लाक़डाऊनच्या काळात नेहमीच्या काळापेक्षा लोकसंख्येचे प्रमाण वाढले काय, हे तपासल्यावरच व आकडेवारी समोर आल्यावरच काम या षड्रिपूची कामगिरी समजू शकेल. राहिला तो क्रोध. याचा आलेख मात्र चढता आहे. देश-विदेशातून महिलांच्या येणाऱ्या व आलेल्या तक्रारी, या पुरुषमंडळी घरात छोट्याछोट्या गोष्टींवरून रागावणे व मारहाण करणे याबाबत आहेत. ते कमी व्हावे म्हणून की, काय व सरकारची तिजोरी खाली झाल्याने बव्हंशी राज्य सरकारांनी मद्यविक्री खुली केली. तेथे सर्वाधिक नियमतोड झाली, ती सामाजिक विलगीकरणाची. पण, मद्य खरेदी करता येते, ही आनंदाची बाब समजून बऱ्याच जणांनी मारहाणीपेक्षा नशेचा सहारा घेतलाय. सरकारला महसुलाचे एक प्रभावी साधन उलब्ध झाले, हे निश्चित. क्रोधाचे प्रमाण किती कमी झाले आहे, याची माहिती अथवा आकडेवारी पुढे आलेली नाही. कदाचित नजिकच्या भविष्यकाळात समाजशास्त्रज्ञ त्यावर प्रकाश टाकतील, अशी आशा. कोरनाच्या काळात मानसिक रोग्यांचे प्रमाण किती व कसे वाढले, हे पाहून त्यावर उपचार करावे लागतील.

आणखी एक जमेची बाजू म्हणजे, करोनाच्या भयाने एरवी चोवीस तास सक्रीय असणाऱ्या गुन्हेगारांना त्यांच्या अड्ड्यांबाहेर पडणे जमले नाही, त्यामुळे गेल्या चार महिन्यांत चोरी, दरोडे, खुनांचे तसेच वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झाले. आत्महत्येचे 2019मधील 445 वरून 2020मध्ये 195वर आले आहे. सामाजिक सुस्थितीत काकणभर का होइना भर पडली, ही समाधानाची बाब होय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com