वैंकय्या नायडूंची निवड ही लोकशाहीला एक आदरांजली- मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

याच दिवशी स्वातंत्र्य लढ्यातील 18 वर्षीय आद्य क्रांतिकारक खुदीराम बोस यांना फाशी इंग्रज सरकारकडून देण्यात आली होती. 

नवी दिल्ली : साध्या, ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येऊन एखाद्या व्यक्तीने देशातील सर्वोच्च पदापर्यंत झेप घेणे हे लोकशाहीला वाहिलेली एक आदरांजली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांचे स्वागत केले. 

भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून वैंकय्या नायडू यांनी शपथ घेतली. नायडू यांनी आज राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पदग्रहण केले. त्यानंतर स्वागतपर भाषणात पंतप्रधान मोदी बोलत होते. या दिवसाला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. याच दिवशी स्वातंत्र्य लढ्यातील 18 वर्षीय आद्य क्रांतिकारक खुदीराम बोस यांना फाशी इंग्रज सरकारकडून देण्यात आली होती. 

"हा दिवस आपल्याला स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांची आणि स्वातंत्र्यानंतर आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीची आठवण करून देतो," असे सांगून मोदी म्हणाले, "नायडू हे स्वतंत्र भारतात जन्माला आलेले पहिले उपराष्ट्रपती आहेत. दीर्घ अनुभवाशिवाय नायडू यांच्याकडे संसदीय कामकाजातील बारकाव्यांचे ज्ञान आहे."

या शेतकऱ्याच्या मुलाने जे.पी. नारायण यांनी हाक दिल्यावर विद्यार्थी चळवळीत उत्स्फूर्तपणे सहभागी होत, एकेक करून आता राज्यघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद मिळवले आहे. शेतकरी आणि गरिबांचे प्रश्न हे नेहमी त्यांच्या चिंतनाचा विषय राहिले आहेत, असे मोदी यांनी सांगितले. 

Web Title: venkaiah naidu vice president tribute to democracy PM modi