'इंदिरा' टू 'सोनिया' व्हाया राजीव गांधी; असा राहिलाय 'काँग्रेस चाणक्यां'चा प्रवास

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 November 2020

काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमद पटेल यांच्या साऱ्या राजकीय प्रवासावर टाकूया एक नजर...

नवी दिल्ली : जेष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचं आज बुधवार सकाळी निधन झालं. 71 वर्षीय अहमद पटेल हे कोरोनाग्रस्त झाले होते. आज सकाळी त्यांच्या मुलाने म्हणजे फैझल यांनी ट्विट करुन सांगितलं की, अहमद पटेल यांचं निधन झालं आहे. अहमद पटेल हे पहिल्यापासून आपल्या राजकिय कारकिर्दीत काँग्रेस  पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. इतकंच नव्हे तर काँग्रेसला मजबूत करण्यात आणि राजकीय डावपेच करण्यात त्यांचे योगदान वादातीत राहिले आहे. इंदिरा गांधीपासून ते आता सोनिया गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसपर्यंत अहमद पटेलांनी काँग्रेसच्या राजकारणात आपले योगदान दिले आहे. काँग्रेसचे चाणक्य म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या या साऱ्या प्रवासावर टाकूया एक नजर...

हेही वाचा - मित्र आणि विश्वासू सहकारी गमावला; पटेलांच्या निधनावर सोनिया गांधींची प्रतिक्रिया

28 व्या वर्षी झाले खासदार 
भरुचमधील पिरामन गावात जन्मलेल्या अहमद पटेलांनी 1977 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांचे वडील इशाकभाई यांनीच त्यांना राजकारणात येण्यासाठी प्रेरणा दिली होती. त्यानंतर त्यांनी 1976 मध्ये त्यांच्या आयुष्यातील पहिली निवडणूक लढवली जी एक पंचायतची निवडणूक होती. 1977 मध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते हरिसिंह भाई महिदा यांनी त्यांच्यात असलेली प्रतिभा ओळखली आणि त्यांनी त्यांचं नाव भरुच लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रातील नेतृत्वाला सुचवलं. 

Image

इंदिरा गांधींनी दिली प्रेरणा 
त्यावेळी त्यांच्या वडिलांचं निधन झालं ज्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. तो त्यांच्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळ होता. आणीबाणीनंतरच्या या निवडणुकीत 64 हजार मतांनी ते विजयी झाले होते मात्र, काँग्रेस पक्ष वाईटरित्या हरला होता. 28 व्या वर्षीच ते खासदार झाले होते. या पराभवानंतरही इंदिरा गांधींच्या जोश आणि सकारात्मकतेमुळे त्यांना खुप प्रेरणा मिळाली. इंदिरा गांधींनी त्यांना नेहमी जमिनीवर आपले पाय ठेवण्याची प्रेरणा दिली. 1986 साली इंदिरा गांधींची हत्या होऊन दोन वर्षे उलटले होते. यावर्षी त्यांनी ठरवले की ते कोणतेही मंत्रीपद न घेता केवळ संघटनेसाठी काम करतील. तेंव्हा राजीव गांधी ऍक्टीव्ह पॉलिटीक्समध्ये होते आणि ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव होते. त्यांनी त्यांना असीम उर्जा आणि प्रामाणिकतेने काम करण्यासाठी प्रेरित केले.

हेही वाचा - काँग्रेसला मजबूत करण्यामध्ये अहमद पटेलांची महत्त्वाची भुमिका; PM नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

राजीव गांधींचे जवळचे सहकारी
इंदिरा गांधींनतर ते राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काम करु लागले. तेंव्हा त्यांना आढळलं की राजीव गांधींमध्ये बदल्याची कसलीही भावना नाहीये. ते 35 वर्षांचे असताना राजीव गांधींनी त्यांना संसदीय सचिव बनवलं होतं. 16 मे 1991 रोजी आमोदमध्ये राजीव गांधी यांची एक रॅली होती. या रॅलीनंतर बडोद्यामध्ये जेंव्हा ते दिल्लीला जाण्यासाठी विमानात बसले तेंव्हा त्यांनी अचानक मागे वळून अहमद पटेलांना म्हटलं की, आपल्या दोघांना सोबत एक फोटो घ्यायला हवा. पटेल म्हणाले आपण पुढच्या वेळी जरुर घेऊ मात्र राजीव गांधींना आग्रह सोडला नाही. आणि पुढच्या 120 तासांतच श्रीपेरुंबदूरमध्ये त्यांची हत्या झाली. 

सोनियाजींना खंबीर साथ
राजीव गांधींनी अहमद पटेलांना नेहमीच विनाशर्त मदत केली होती. पटेलांनी ठरवलं की आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत ते काँग्रेसच्या सेवेसाठी काम करतील. त्यांनी 14 वर्षांपर्यंत श्रीमती सोनिया गांधींचे सचिव म्हणून काम केलं. त्यांची अनुकरणीय दृष्टी, शक्ती आणि कृतज्ञतेच्या भावनेने त्यांना प्रेरित केलं. राहुल गांधींसोबत काम करणं देखील प्रेरणादायी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. राजीवजींना वाटायचं की युवकांनी राजकारणात मुख्य भुमिका बजावायला हवी. त्याचप्रमाणे राहुल गांधींही काम करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: veteran congress leader ahmed patel demise know about his journey from indira gandhi to sonia gandhi via rajeev gandhi