रोखठोक राजकीय भूमिका मांडणारे गिरीश कार्नाड

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जून 2019

ज्येष्ठ अभिनेते आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अशी गिरीश कार्नाड यांची ओळख होती. ते 81 वर्षाचे होते. अभिनय क्षेत्राबरोबरच सामाजिक परिस्थितीचे भान असलेले व धर्मनिरपेक्ष तत्वांशी बांधिलकी कायम राखणारे तसेच हिंदुत्ववादी संघटनांबरोबरचे आपले मतभेद उघडपणे थेट मांडणारे अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती.

बंगळुरू : साहित्य क्षेत्रात असूनही अनेकवेळा राजकीय विषयांवर परखड भूमिका मांडणारे ज्येष्ठ अभिनेते गिरीश कार्नाड यांचे आज (सोमवार) निधन झाले. हिंदुत्त्ववादी संघटनांशी उघडपणे वाद घालणाऱ्या कार्नाड यांनी कोरेगाव भीमातील हिंसाचारासंबंधी शहरी नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर 'अर्बन नक्षल' या मोहिमेतही सहभाग घेतला होता. 

ज्येष्ठ अभिनेते आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अशी गिरीश कार्नाड यांची ओळख होती. ते 81 वर्षाचे होते. अभिनय क्षेत्राबरोबरच सामाजिक परिस्थितीचे भान असलेले व धर्मनिरपेक्ष तत्वांशी बांधिलकी कायम राखणारे तसेच हिंदुत्ववादी संघटनांबरोबरचे आपले मतभेद उघडपणे थेट मांडणारे अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती. आपल्या राजकीय भूमिकांबद्दल ते जागरूक होते. मात्र कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता ते आपली भूमिका मांडत असत. नाटक चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील विविध वाहिन्यावरून काम करत असताना लेखक म्हणूनही ते सक्रीय होते. 

प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा काही वर्षांपूर्वी आलेला "एक था टायगर' या चित्रपटातील भूमिका त्यांची छोटीशी पण लक्षवेधी होती. कर्नाड यांचे आत्मचरित्र राजहंस प्रकाशनाने मराठीत प्रसिद्ध केले होते. कर्नाड मराठी माणसांशी खऱ्या अर्थाने जोडले गेले ते 'उंबरठा' चित्रपटातील भूमिकेने. जब्बार पटेल यांच्या या चित्रपटात स्मिता पाटील यांच्याबरोबरची त्यांची भूमिका त्यावेळी चांगलीच गाजली होती. माथेरान येथे जन्म झालेल्या कर्नाड यांचे काही काळ महाराष्ट्रात वास्तव्य होते मग ते धारवाडला गेले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Veteran Film And Theatre Personality Girish Karnad Dies At 81