प्रणबदा- एक मुरब्बी राजकारणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pranab mukharjee

प्रणव मुखर्जींच्या कारकीर्दीत वादग्रस्त ठरलेली एकमेव गोष्ट म्हणजे राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी राष्ट्रसेवक संघाच्या बैठकीपढे केलेले भाषण होय.

प्रणबदा- एक मुरब्बी राजकारणी

माजी राष्ट्रपती भारतरत्न  प्रणब मुखर्जी यांचं आज वयाच्या 84 व्या वर्षी दुःखद निधन झालं. गेले काही दिवस ते करोना व अऩ्य व्याधींशी झगडत होते. येथील सैनिकी रुग्णालयात डॉक्टरांनी सारे औषधोपचार केल्यानंतरही शरीर त्यांना साथ देऊ शकलं नाही. भारतीय राजकारण व पत्रकार विश्वात त्यांना प्रणबदा या नावानं ओळखलं जायचं. बंगालीत मोठ्या भावाच्या नावापुढे दा हे अक्षर जोडतात. व त्यानुसार हाक मारतात. गेल्या अर्ध शतकापेक्षा अधिक काळ ते राजकारणात सक्रीय होते. 2012 मध्ये ते राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांनी जाहीर केले, की मी आता राजकारणातून मुक्त झालो आहे. 

राष्ट्रपती हा कोणत्याही पक्षाचा नसतो. राजकीय संकटकाळातही त्याला पक्षनिरपेक्ष व घटनेला अनुसरून निर्णय घ्यावे लागतात. प्रणबदांच्या पाच वर्षांच्या (2012 ते 2017) कार्यकाळात त्यांना कोणत्याही गंभीर राजकीय संकटाला सामोरे जावे लागले नाही. त्यातील अर्धाअधिक काळ हा काँग्रेस पक्षाच्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या केंद्रीय सरकारचा होता व उरलेला कार्यकाळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा होता. 

काँग्रेसच्या काळात सरकारने त्यांना पद्मविभूषण सन्मान देऊन गौरविले, तर मोदी सरकारने त्यांना भारतरत्न हा किताब बहाल केला. राजकारण व घटना याबाबत आपण अनेकवेळा प्रणबदांचा सल्ला घेतो, असे मोदी यांनी जाहीरपणे म्हटले होते. शेवटपर्यंत त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण होते. त्यांच्या कारकीर्दीत वादग्रस्त ठरलेली एकमेव गोष्ट म्हणजे राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी राष्ट्रसेवक संघाच्या बैठकीपढे केलेले भाषण होय. 

हे वाचा - दिल्लीत नवा होतो तेव्हापासून मुखर्जींनी मार्गदर्शन केलं; मोदींनी उलगडला स्नेहबंध

प्रणबदांना भारतरत्न किताब बहाल करून मोदी यांनी प्रणबदांवर काँग्रेसमध्ये असताना झालेल्या अपमानचा एकप्रकारे वचपा घेतला. प्रणबदा हे काँग्रेसला वाहून घेतलेले नेते व इंदिरा गांधी निष्ठ. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या 1984 मधील हत्येनंतर काँग्रेसमघील ज्येष्ठतम व सर्वाधिक अनुभवी म्हणून  पंतप्रधानपदाची माळ आपल्याच गळ्यात पडेल, अशी अपेक्षा ते करीत होते. तथापि, पक्षाने राजीव गांधी यांची निवड केल्याने ते सोनिया गांधी व काँग्रेसवर बेहद नाराज झाले. पक्षाने त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांनी 1986 मध्ये राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. परंतु, राजीव गांधी यांच्याशी मतभेद मिटल्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी त्यापक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण केले व स्वगृही परतले. 

गेल्या चाळीस वर्षात संसद व संसदेबाहेर त्यांचे राजकारण मला पाहावयास मिळाले. अधुनमधून भेट होत असे. त्यातून नेहमीच प्रणबदांचे प्रखर बुद्धिमान व्यक्तित्व अनुभवायला मिळे. ते मुरब्बी नेते होते. डऑ. मनोहन सिंग यांच्या कारकीर्दित तर ते इतके शक्तीशाली झाले होते, की त्यांना प्रतिपंतप्रधान म्हटले जाई. त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचे तब्बल 40 कार्यगट काम करायचे. कोणताही राजकीय अथवा शासकीय प्रश्न आला, की पक्ष व पत्रकार ते कोणता तोडगा काढताहेत, याकडे लक्ष देऊन असत. काही अर्थाने ते डॉ. मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांच्या दरम्यान सामंजस्याचा एक पूल होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तरीही काँग्रेसमधून 1986 मध्ये ते बाहेर गेल्याची सल सोनिया गांधी यांना होती. त्यांची पंतप्रधान होण्याची संधि हुकली, याचीही जाणीव त्यांना होती. म्हणूनच, 2012 मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली, तेव्हा पक्षामधून प्रणबदा व्यतिरिक्त एकही नाव पुढं आलं नाही. 

हे वाचा - पत्रकार, अर्थमंत्री ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

डॉ. सिंग यांच्या सरकारची खरी परिक्षा होती, ती 2005 मध्ये अमेरिकेबरोबर केलेल्या नागरी अणुऊर्जा निर्मितीबाबत अमेरिकेशी झालेल्या 123 या समझोत्याबाबत. त्याला डाव्या आघाडीचा पाठिंबा नव्हता. त्या काळात प्रणबदांच्या तालकटोरा मार्गावरील बंगल्यात दिवसेंदिवस काँग्रेस व डाव्या आघाडीच्या नेत्यांच्या बैठका चालायच्या. बैठकीतून काय निष्पन्न होते, ह पाहाण्यासाठी आम्ही (पत्रकार) रोज त्यांच्या बंगल्याबाहेर उभे राहून त्यांची वाट पाहायचो. सायंकाळी ते दरवाजाशी यायचे व अजून बोलणी चालू आहेत, असे सांगायचे. चर्चेचे गुऱ्हाळ अऩेक दिवस चालले. तोडगा निघाला नाही. प्रणबदांनी आपल्या वाटाघाटींच्या कौशल्याची पराकाष्ठा केली होती. शेवटी, डाव्या आघाडीने या मुद्यावरून सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे ठरविले, तेव्हा प्रणबदांनी डॉ. सिंग यांना जोरदार पाठिंबा देत, डाव्या आघाडीच्या निर्णयाची काळजी करू नका, मार्ग निघेल, असे सांगितले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी सरकारला पाठिंबा जाहीर केला, त्यामागेही प्रणबदांची शिष्टाई होती. 

प्रणबदांनी काँग्रेस संघटनेतील अनेक महत्वाची पदे सांभाळली, तसेच केंद्रात परराष्ट्र, वित्त, संरक्षण, जहाज व वाहतुक, वाणिज्य, औद्योगिक विकास, महसूल व बँकींग ही खाती अत्यंत कार्यक्षमेतेने संभाळली. नियोजन मंडळाचे ते उपाध्यक्ष होते. तसेच, राज्यसभा व लोकसभेत पक्षाचे प्रमुख नेते म्हणून कार्य केले. चर्चेदरम्यान, विषय कोणताही असो त्याच्या खोलात जात ते मुद्देसूद बोलताना मी पाहिले आहे. काँग्रेस पक्षाचा ते चालताबोलता माहितीकोष होते, यात शंका नाही. कारण, काँग्रेसच्या वाटचालीत स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या घडमोडी, पक्षाची अधिवेशने, त्यांच्या तारखा व त्यात कोण काय बोलले, हे ते तपशीलासह जेव्हा सांगत, तेव्हा एकणारे दिग्मूढ होऊन जात. त्यांची स्मरणशक्ती व घटनेचा अभ्यास दांडगा होता. 

हे वाचा - बंडखोर प्रणवदा : काँग्रेसला राम राम करून काढला होता पक्ष

त्यांना जेव्हा महत्वाची मंत्रीपदे मिळाली, तेव्हा, तालकटोरा मार्गावरील बंगल्यापेक्षा मोठे निवासस्थान त्यांना सरकराने देऊ केले, तरीही ते त्यांनी सोडले नाही. राष्ट्रपती झाल्यानंतर अर्थातच त्यांना ते सोडावे लागले. राष्ट्रपती पदी असताना त्यांनी परदेशदौऱ्यात भारत व अन्य देशांचे संबंध वाढविण्यासाठी शिष्टाई केली. ते मुरलेले राजकारणी व मुत्सद्दी होते.

प्रणबदा पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवित. तेथे त्या काळात डाव्या आघाडीचे सरकार तबब्ल तीस वर्षे होते. ते सरकार काँग्रेसविरोधी होते. तरीही मुकर्जी निवडून येत. याचे महात्वाचे कारण म्हणजे, त्यांना मुस्लिमांव्यतिरिक्त मिळणारा डाव्या आघाडीचा पाठिंबा. विनोदाने असे म्हटले जायचे, की दादाको वॅटरमेलन जैसा सपोर्ट मिलता हे. उपरसे हरा सपोर्ट और अंदरसे लाल सपोर्ट.

इँडियन असोसिएशन ऑफ फ्ऑरेन अफेअर्स करस्पॉन्डन्टस् या संघटनेचा निमंत्रक-अध्य़क्ष या नात्याने परराष्ट्र मंत्री असताना मी त्यांना वार्तालापासाठी आमंत्रित केले होते. त्यासाठी ते आले व सुमारे दीड तास आमच्या बरोबर परराष्ट्र संबंधांबाबत सविस्तर बोलले. काही वर्षांनी ते राष्ट्रपती झाल्यावर मी त्यांना पत्र लिहिले व पुन्हा संघटनेच्या सदस्यांना भेटायचं आहे, असं सांगितलं. त्यावर काही दिवसातच त्यांचं आमंत्रण आलं. तत्पूर्वी आलेल्या निरोपात त्यांनी म्हटलं होतं, की भेटीन, परंतु, राजकारणाबाबत बोलणार नाही. माझ्या नेतृत्वाखाली संघटनेच्या 45 सदस्यांनी त्यांची भेट राष्ट्रपती भवानात घेतली. त्यावेळी आडून विचारलेल्या राजकीय प्रश्नांना उत्तरे देण्याचे त्यांनी टाळले. पण, राज्यघटना, त्यातील राष्ट्रपतींचे स्थान, त्याची कर्तव्ये, लोकशाही टिकविण्यासाठी त्याने टाकावयाची पावले, आदींबाबत दिलखुलास व सविस्तर चर्चा केली. त्याचवेळी आत्मचरित्र लिहिण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला. त्यानंतर काही महिन्यात त्यांचे द टर्ब्युलंट इयर्स हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी राजकीय घडामोडींबाबत सविस्तर लिहिले आहे. राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर पश्चिम बंगालमद्ध्ये स्थायिक होण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला होता. तो मात्र प्रत्यक्षात उतरला नाही. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक उत्तुंग नेतृत्व निमाले.

Web Title: Veteran Journalist Vijay Naik Write Blog Former President Pranab Mukherjee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top