स्पंदने संसदेतील सेन्ट्रल हॉलची

स्पंदने संसदेतील सेन्ट्रल हॉलची
स्पंदने संसदेतील सेन्ट्रल हॉलची

लोकसभा व राज्यसभा ही संसदेची सर्वोच्च व्यासपीठे. त्यांना उपरोधाने "टॉकिंग शॉप्स'ही म्हटलं जातं. देशाच्या समस्यांवर तिथं चर्चा होते. महत्वाचे कायदे संमत केले जातात. राजकारणाचे वारे कोणत्या दिशेने वाहतेय, त्याची कल्पना येते. गेले महिनाभर चाललेल्या हिवाळी अधिवेशनात एकमेव विधेयक दोन्ही सभागृहात कोणताही गोंधळ न होता संमत झाले, ते निःशक्त (विकलांग) व्यक्ती अधिकार विधेयक 2016 हे होय. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निश्‍चलनीकरणाच्या निर्णयामुळे कामकाजाचे तब्बल 20 दिवस वाया गेले. त्यामुळे लाक्षणिकदृष्ट्या सभागृहेच विकलांग झाल्याचे चित्र निर्माण झाले. निश्‍चलनीकरणारवर चर्चा सुरू झाली व सहाव्या भाषणावर जी थांबली, ती पुढे सरकलीच नाही. परिणामतः गजबजत होता, तो संसदेचा मध्यवर्ती सेंट्रल हॉल. याच सदनात 1947 मध्ये सत्तांतर झाले, इथेच भारताची राज्यघटना तयार करण्यात आली. सभागृहे वारंवार तहकूब होत असल्याने, सदस्य सेंट्रल हॉलमध्ये येऊन बसू लागले.

राजकारणाची स्पंदने जाणून घेण्याचे ते महत्वाचे ठिकाण. राजकीय नेत्यांबरोबर हितगूज करण्याची, त्यांच्या खांद्याला खांदा लावून बसण्याची व वाद घालण्याची संधी मिळते ती इथे. आतल्या बातम्या मिळतात, आणि पुड्याही सोडल्या जातात. रूमर (अफवा) व ह्यूमर (विनोद) यांचं उगमस्थानही सेंट्रल हॉल. पंतप्रधान मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी निश्‍चलनीकरणाचा निर्णय जाहीर केला व 16 नोव्हेबर रोजी हिवाळी अधिवेशन सुरू झाले. त्यांना देशभरातून पाठिंबा मिळाला, विरोधी पक्षही सामील होते. त्यामुळे, सेंट्रल हॉलमध्ये प्रारंभी मोदी यांचा उदोउदो करणारे भाजपचे अनेक खासदार येऊन अभिमानाने बोलू लागले. विरोधकांची कशी दांडी उडाली, असाही अविर्भाव त्यांच्या चेहऱ्यांवर दिसत होता. परंतु, देशात जशा सर्वत्र रांगा वाढू लागल्या, टीका होऊ लागली, विरोधक एकत्र आले, सभागृहांत सरकारला फैलावर घेऊ लागले, तसे हळूहळू भाजपचे सदस्य सेंट्रल हॉलमध्ये दिसेनासे होऊ लागले. येत होते, ते अर्थमंत्री अरूण जेटली.

जेटली हे पत्रकारांचे मित्र. त्यांना तासंतास गप्पा करावयास आवडतात. कडकीच्या दिवसांचा फटका त्यांनाही बसला. ते म्हणाले, "" मी पन्नास लोकांना घरी जेवायचे आमंत्रण दिले खरे. पण पत्नी म्हणाली, आहो, दोन दिवसांपूर्वीे आपण 48 हजार रू बॅंकेतून काढून आणले आणि तुम्ही पन्नास लोकांना जेवायला बोलावलय. एक दोन दिवसातच पैसे संपतील, हे तरी ध्यानात घ्यायला हवं होतं."" जेटली म्हणाले, की तिला सांगितलं, की नेहमी ज्याच्याकडून जेवण मागवतो. त्याच्याकडून ते मागवू. बिलाचे पैसे घ्यायला तो थोडं थांबू शकतो! जिथं अर्थमंत्र्याला अडचण होऊ शकते, तिथं सामान्याचं काय?

"दोन हजार रूपयांच्या गुलाबी नोटांवरील रंग पुसला जातोय,""असं वृत्त त्याच दरम्यान आलं. दुसऱ्या दिवशी जेटली सेंट्रल हॉलमध्ये आले, तेव्हा पत्रकारांनी त्यांच्या भोवती कोडाळं केलं. ""नोटेचा रंग कसा जातोय, त्यामुळे काय धोके उद्भवू शकतात, बनावटी नोटा छापणे सोपे आहे काय, काळ्या पैशाचा सुगावा लावण्यासाठी नोटांमध्ये इलेक्‍ट्रॅनिक चिप घातली आहे काय,"" अशा प्रश्‍नांचा एकच भडीमार केला. एकाने दोन हजार रू.ची नोट जेटली यांच्या हातात दिली. जेटली यांनी खिशातून टिश्‍यू पेपर काढला व टेबलावर नोट ठेवून तिच्यावर घासला. अन्‌ काय, तिचा थोडा गुलाबी रंग टिश्‍यू पेपरलाही लागला. जेटली म्हणाले, ""नोटा नव्या कोऱ्या असल्याने अगदी थोडा रंग निघतोय, परंतु, त्यामुळे फरक पडणार नाही. दुसऱ्या पत्रकाराने शंभर रूपयाची नोट पुढे केली. त्यावर जेटली यांनी पुन्हा टिश्‍यू पेपर घसला. तिलाही काही रंग लागला. आणखी एका पत्रकाराने डॉलरची नोट पुढे केली. पण टिश्‍यू पेपर घासूनही तिचा रंग निघाला नाही. तेव्हा मात्र जेटली व पत्रकारात हंशा पिकला. नोटांच्या साठ्याचा सुगावा लागावा, यासाठी ""कोणतीही इलेक्‍ट्रॉनिक चिप नोटेत नाही,"" असंही जेटली यांनी सांगितलं. तसंच, ""नव्या नोटा देण्यासाठी आवश्‍यक असलेले एटीएमचे नूतीनकरण (रिकॅलिब्रेशन) वेगाने सुरू असून, लोकांना आणखी काही दिवस कळ काढावी लागेल,"" असं त्यांचं भाकित.

जेटली यांचे कट्टर विरोधक व राज्यसभेचे सदस्य सुब्रमण्यम स्वामींचीही भेट झाली. पंतप्रधान मोदी यांना भेटून आयकर पूर्णपणे रद्द करण्याची शिफारस केल्याचं त्यांनी सांगितलं. ""देशातील केवळ अडीच ते तीन टक्के लोक आयकर भरतात. म्हणजे, सव्वा अब्ज लोकसंख्येपैकी फक्त 36 दशलक्ष लोक आयकर भरतात. त्यामुळे त्यांना दिलासा देणं आवश्‍यक आहे, आयकराऐवजी सरकराने महसूल वाढविण्यासाठी अन्य स्त्रोत शोधले पाहिजे,"" असं स्वामींनी मोदींना सांगितलं. ""प्रतिसाद काय मिळाला,"" असं विचारता स्वामी म्हणाले, त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं. ""तुम्ही एवढे जेटलीविरोधी का"" अशी पृच्छा करता स्वामी उत्तरले,"" अर्थव्यवस्था व अर्थकारणाबाबत जेटली यांचं ज्ञान आहे, ते केवळ डाकतिकिटांच्या मागे जेवढी रिकामी जागा असते, त्यात मावेल एवढं!""

जेटलींना अर्थमंत्रीपद मिळालं, तेव्हापासून स्वामी त्यांच्यावर खार खाऊन आहेत. पक्षनिष्ठेमुळे त्यांना राज्यसभेचं पद मिळालं. त्या व्यासपीठावरून स्वामी अधुनमधून सोनिया गांधी व कॉंग्रेसवर भन्नाट आरोप करतात, म्हणून भाजप खूष आहे. परंतु, मोदी अद्यापही आपल्याला मंत्रीपद देण्यास तयार नाही, याची खंत स्वामी यांच्या बोलण्यातून नेहमी जाणवते. याच स्वामी महाशयांनी काही वर्षांपूर्वी सोनिया गांधी व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री कै.जयललिता यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी दिल्लीतील पंचताराकित अशोक हॉटेलमध्ये जंगी भोज आयोजित करून पत्रकारांना आमंत्रित केले होते. तिथं सोनिया गांधी व जयललिता उपस्थित होत्या. स्वामींनी राजकीय चमत्कार केला खरा, पण हा प्रसंग सोडला, तर त्या दोन्ही नेत्या कधीही राजकारणात एकत्र आल्या नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com