गोरखपूर, फूलपूरमध्ये यंदा मताधिक्य जास्त असेल: आदित्यनाथ

वृत्तसंस्था
रविवार, 11 मार्च 2018

आज सकाळी मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले, की या निवडणुकीची मला कसलीही भीती वाटत नाही. यंदा 2014 मध्ये मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळेल. मुंगूस आणि साप एकत्र येण्याने काही फरक पडत नाही. सप आणि बसप युती निष्फळ ठरेल.

लखनौ - गोरखपूर आणि फूलपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान होत असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यंदा 2014 पेक्षा मताधिक्य जास्त असेल असा दावा केला आहे. 

गोरखपूर आणि फूलपूर हे अनुक्रमे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचे मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघांमध्ये तिहेरी लढत होत आहे. गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला बहुजन समाज पक्षाने पाठिंबा दिला असल्यामुळे येथील लढत चुरशीची झाली आहे. आदित्यनाथ आणि मौर्य यांची विधान परिषदेवर निवड झाल्यामुळे या दोन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. दोन्ही मतदारसंघांत निमलष्करी दलाचे सुमारे साडेसहा हजार जवान तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. गोरखपूरमधून दहा उमेदवार नशीब अजमावत असून, फूलपूरमधून 22 उमेदवार रिंगणात आहेत. 

आज सकाळी मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले, की या निवडणुकीची मला कसलीही भीती वाटत नाही. यंदा 2014 मध्ये मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळेल. मुंगूस आणि साप एकत्र येण्याने काही फरक पडत नाही. सप आणि बसप युती निष्फळ ठरेल.

Web Title: Victory Margin Will Be As Big As In 2014 says Yogi Adityanath On UP Bypolls