विधानसभा निवडणूक आली; 'मोफत देण्या'चा खेळ सुरू झाला..

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 4 जून 2019

एक गांधीवादी आवाहन!
ज्या महिला तिकीट काढून प्रवास करू शकतात त्यांनी ही सबसिडी घेऊ नये. त्यामुळे अधिकाधिक महिलांना फुकट प्रवासाचा लाभ मिळेल, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. मात्र दिल्लीची एकूण प्रकृती पाहता त्यांच्या या गांधीवादी आवाहनाचा परिणाम शून्य होण्याची दाट शक्‍यता वर्तविली जाते.

दिल्ली मेट्रो आणि बसमध्ये महिलांना मोफत प्रवास, खर्च सरकार उचलणार 
नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीची जीवनवाहिनी बनलेल्या मेट्रोसह दिल्ली परिवहन महामंडळाच्या (डीटीसी) बसेसमध्ये आता महिलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळेल. दिल्लीत पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज महिलांना सार्वजनिक वाहतूक विनामूल्य करण्याची घोषणा करून हुकमाचा पत्ता खेळला आहे.  

लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागांवर आपटी खाल्लेल्या ‘आप’ नेतृत्वाने विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना वेळीच सावध होण्याची गरज ओळखली व दिल्लीत सार्वजनिक वाहतूक महिलांना मोफत करण्याची चाल खेळली आहे. दिल्ली मेट्रो येथील सरकारच्या अखत्यारीत नसून ती केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळ - डीएमआरसी यावर काय भूमिका घेते हे पाहणे रंजक ठरणार आहे. किंबहुना यावरूनच केजरीवालांनी मोदी सरकार-२ बरोबर संघर्षाचा पहिला मुद्दा बाहेर काढल्याचे दिसत आहे. मेट्रोने यापूर्वी दर वाढविले तेव्हा केजरीवाल यांच्या पक्षाने त्याला तीव्र विरोध केला होता. याआधी दिल्लीच्या महिलांना राखीपौर्णिमा व भाऊबीजेला मोफत प्रवासाची सोय होती. 

आता केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेत घेत मेट्रोच्या सर्व लाईन्समध्ये तसेच दिल्लीतील सर्व क्‍लस्टर व डीटीसी बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता त्यासाठी पैसे द्यावे लागणार नसल्याचे जाहीर केले. त्यांनी सांगितले की, येत्या २ ते ३ महिन्यांत ही सेवा दिल्लीभर लागू होईल. याचा सारा खर्च दिल्ली सरकार उचलेल. डीटीसी व मेट्रोला आपण याबाबतचे सविस्तर प्रस्ताव बनविण्यास सांगितले असून, त्यासाठी अधिकाऱ्यांना एका आठवडाभराची मुदत दिली आहे. मेट्रोसाठी आम्हाला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Women Free Metro Bus Arvind Kejariwal Politics