अखिलेश यांच्या यात्रेकडे राज्याचे लक्ष

पीटीआय
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव उद्यापासून त्यांची बहुप्रतिक्षित "विकास रथयात्रा' पुन्हा सुरू करीत आहेत. त्या वेळी यात्रेला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव आणि त्यांचे बंधू शिवपाल यादव उपस्थित राहणार की नाही हे अजूनही गुलदस्तात आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव उद्यापासून त्यांची बहुप्रतिक्षित "विकास रथयात्रा' पुन्हा सुरू करीत आहेत. त्या वेळी यात्रेला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव आणि त्यांचे बंधू शिवपाल यादव उपस्थित राहणार की नाही हे अजूनही गुलदस्तात आहे.

समाजवादी पक्षाचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम दोन दिवसांनी होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर उद्याच्या या यात्रेसाठी या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागलेले आहे. त्यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती समाजवादी पक्षाची सध्याची सारी स्थिती स्पष्ट करणार आहे. गेल्या काही दिवसांत यादव कुटंबातील कलहामुळे समाजवादी पक्षातील सारे राजकारण ढवळून निघालेले आहे.

उद्याच्या रथयात्रेला उपस्थित राहणार का, या पत्रकारांच्या प्रश्‍नावर बोलताना प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी थेट उत्तर न देता संभ्रम कायम ठेवला. ते म्हणाले, ""पक्षाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाच्या आयोजनात सध्या मी व्यग्र आहे. यात्रा जर उद्या सुरू होणार आहे, तर पक्षाचा हा मोठा कार्यक्रमदेखील पाच तारखेला आहे.''

अखिलेश यांच्या "विकास से विजय तक यात्रे'ला मुलायमसिंह यादव उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांनीही तसा थेट शब्द दिला नसल्याचे पक्षात बोलले जाते. अखिलेश यात्रेसाठी उपस्थित राहण्याबाबत वडिलांचे मन किती वळवू शकतात, त्यावर सारे अवलंबून असल्याचे समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने स्पष्ट केले.

दरम्यान, पक्षातून हकालपट्टी केलेले आमदार व अखिलेश यांचे विश्‍वासू सुनील यादव साजन म्हणाले, की यात्रेची तयारी पूर्ण झालेली आहे. नेताजी मुलायमसिंह यादव यांच्या हस्तेच यात्रेला हिरवा झेडा दाखविला जाईल. या वेळी पक्षाचे सर्व नेते उपस्थित राहतील.

दरम्यान, उद्याच्या यात्रेसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असून, त्यामध्ये किमान पाच हजार जीप आणि ट्रक सहभागी होतील, असे बोलले जाते. लखनौ ते उनाऊ या साठ किलोमीटरच्या यात्रामार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. "शिवपाल कहे दिलसे, अखिलेष का अभिषेक फिर से' ही या बॅनरवरील घोषणा सर्वांच्या चर्चेचा विषय बनलेली आहे.

Web Title: vikas rathyatra by akhilesh yadav