बंगालमध्ये जोरदार राडा; भाजपचे कार्यकर्ते-पोलिस भिडले

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 जून 2019

निवडणुकीनंतरचा हिंसाचार आणि पक्षाचे कार्यकर्ते व समर्थकांवरील हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी भाजपच्यावतीने बुधवार (ता.12) येथे करण्यात आलेल्या आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण लागले.

कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. निवडणुकीनंतरचा हिंसाचार आणि पक्षाचे कार्यकर्ते व समर्थकांवरील हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी भाजपच्यावतीने बुधवार (ता.12) येथे करण्यात आलेल्या आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण लागले. भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये अनेकजण जखमी झाल्याचे समजते. या वेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला.

या धुमश्‍चक्रीमध्ये भाजपचे नेते मुकुल रॉय, एस. एस. अहलुवालिया यांच्या डोक्‍यास अश्रुधुराच्या नळकांड्या लागल्याने ते जखमी झाले. भाजपचे कार्यकर्ते येथील बिपीन बेहारी गांगुली स्ट्रीटवर आंदोलन करत होते. हे आंदोलक "लाल बझार'च्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना रोखल्याने दोन्ही गटांमध्ये जोरदार झटापट झाली. या वेळी आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने बाटल्या आणि दगड फेकायला सुरवात केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा केला. 

बड्या नेत्यांचा सहभाग
आजचे आंदोलन भाजपने प्रतिष्ठेचे केले होते. भाजपच्या अठरा नवनिर्वाचित खासदारांसोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, भाजपचे पश्‍चिम बंगालसाठीचे रणनीतिकार कैलास विजयवर्गीय आणि ज्येष्ठ नेते मुकुल रॉय हेदेखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. वेलिंग्टन भागातून हे कार्यकर्ते लालबझार येथील कोलकता पोलिस मुख्यालयाच्या दिशेने निघाले असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. 

हिंसाचाराच्या चौकशीची मागणी
भाजप नेते मुकुल रॉय यांनी शनिवारी उत्तर-24 परगणा या जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारासाठी ममता बॅनर्जी यांनाच जबाबदार ठरविले असून, या घटनेची राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ममतांनीही भाजपवर टीका करताना हिंसाचारासाठी त्यांच्याच पक्षाचे नेते जबाबदार असल्याचे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violent turn of in West Bengal Clashes between police and BJP protesters