विशाखापट्टण, बियास सर्वाधिक स्वच्छ स्थानक

यूएनआय
गुरुवार, 18 मे 2017

ए-1 श्रेणीतील सर्वात अस्वच्छ स्थानकात दरभंगा स्थानक श्रेणीत नीचांकी स्थानावर आहे. दरभंगा स्थानकावर प्लॅटफॉर्म तुटलेले असताना दुसरीकडे कचऱ्याचे ढीग असल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले आहे

नवी दिल्ली - विशाखापट्टण आणि बियास रेल्वे स्थानके ही देशातील सर्वात स्वच्छ स्थानके तर दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे विभाग सर्वात स्वच्छ विभाग म्हणून रेल्वेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारतअंतर्गत राबवलेल्या अभियानात स्थानकांचा समावेश होता. विशाखापट्टण स्थानक ए-1 श्रेणीत अव्वल तर बियासला ए श्रेणीत अव्वल स्थान मिळाले आहे. सिकंदराबाद आणि जम्मू-तावी स्थानकांना ए-1 श्रेणीत अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान देण्यात आले आहे. खम्मम (आंध्र प्रदेश) आणि नगर (महाराष्ट्र) या स्थानकांना ए श्रेणीत अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळाले आहे.

क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून ए-1 श्रेणीतील 75 स्थानकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. ए-1 श्रेणीतील सर्वात अस्वच्छ स्थानकात दरभंगा स्थानक श्रेणीत नीचांकी स्थानावर आहे. दरभंगा स्थानकावर प्लॅटफॉर्म तुटलेले असताना दुसरीकडे कचऱ्याचे ढीग असल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. सर्वाधिक स्वच्छ असलेल्या पहिल्या दहा स्थानकात दिल्लीचे आनंद विहारने स्थान पटकावले आहे. हे स्थानक पाचव्या स्थानावर आहे. तसेच निजामुद्दीन स्थानक 23 व्या तर जुने दिल्ली स्थानक 24 व्या स्थानावर आहे. सर्वाधिक अस्वच्छ स्थानकाच्या यादीत दुसरा क्रमांक भोपाळ स्थानकाचा तर तिसऱ्या स्थानावर अंबाला कॅंटोन्मेंट स्थानकाचा लागला आहे. या स्थानकांची स्थिती अत्यंत खराब असून ठिकाठिकाणी कचरा असल्याचे आढळून आले आहे.

. . . . . .

Web Title: Visakhapatnam railway station cleanest