संबंधांना सामंजस्याचा पाया: पंतप्रधान

वृत्तसंस्था
शनिवार, 26 मे 2018

'विश्‍वभारती'च्या पदवीप्रदान समारंभात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

शांतिनिकेतन (प. बंगाल) : भारत आणि बांगलादेश हे सहकार्य आणि सामंजस्याच्या आधारावर जोडले गेलेले दोन देश आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. येथील विश्‍वभारती विद्यापीठाच्या 49 व्या पदवीप्रदान समारोहादरम्यान ते बोलत होते. या समारंभात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या.

पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना यांनी आज येथे "बांगलादेश भवन'चेही उद्‌घाटन केले. याप्रसंगी मोदी म्हणाले, ""भारत आणि बांगलादेशमध्ये सहकार्य आणि सामंजस्य आहे. संस्कृती असो वा सरकारी धोरण, दोन्ही देश एकमेकांपासून बऱ्याच गोष्टी शिकतात. बांगलादेश भवन हे त्याचेच उदाहरण आहे. हे भवन दोन्ही देशांच्या सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक आहे.'' विश्‍वभारती विद्यापीठ 50 गावांचा विकास करत असल्याची माहिती मिळाल्यावर मोदींनी त्यांना केंद्र सरकारतर्फे सर्वप्रकारे साह्य करण्याचे आश्‍वासन दिले.

विद्यार्थ्यांना सल्ला
गुरुदेव टागोरांच्या एका कवितेचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना कोणत्याही कठीण परिस्थितीसमोर हार न मानता स्वप्ने साकार करण्याचे आवाहन केले. "2022 पर्यंत नवा भारत निर्माण करण्याची प्रतिज्ञा भारतीयांनी घेतली आहे. हे केवळ शिक्षणाद्वारेच शक्‍य आहे आणि त्यासाठी विश्‍वभारतीसारख्या संस्थांची आवश्‍यकता आहे. तुमच्याबरोबर कोणीही नसेल, तर लक्ष्याकडे एकट्याने वाटचाल करा. विकासाच्या दिशेने तुम्ही एक पाऊल टाकले, तर सरकार चार पावले पुढे जाईल,' असे मोदी म्हणाले.

टागोर हे दोघांचेही : शेख हसीना
"रवींद्रनाथ टागोरांनी भारत आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत लिहिले आहे, त्यामुळे ते दोन्ही देशांचे आहेत. त्यांनी त्यांच्या बहुतांश कविता बांगलादेशातील भागातच लिहिल्या आहेत. त्यामुळे तर त्यांच्यावर आमचा अधिक अधिकार आहे,' असे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या वेळी म्हणाल्या. रोहिंग्या मुस्लिमांना बांगलादेशने मानवतेच्या दृष्टिकोनातून आधार दिला आहे. त्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत, यामध्ये भारताने सहकार्य करावे, असे आवाहनही शेख हसीना यांनी या वेळी केले.

Web Title: vishwa bharti university convocation ceremony and narendra modi