माझा 'विवेक' सुटला, माफी मागतो..

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मे 2019

एखादी गोष्ट पाहिल्यांदा पाहिल्यावर माझ्यासाठी हास्यास्पद वाटत असली तरी तीच सर्वांसाठी हास्यास्पद असेल असे नाही. मी गेली दहा वर्षे तब्बल दोन हजारांहून जास्त वंचित महिलांच्या सशक्तीकरणाचे काम करत आहे आणि मला कोणत्याही महिलेचा अनादर करायचा नाही.

मुंबई : एक्‍झिट पोल आणि अभिनेत्री ऐश्‍वर्या राय हिचे खासगी आयुष्य, यांची तुलना करणारे संदर्भहीन मिम अखेर विवेक ओबेरॉयने डिलीट केले असून त्याने त्याबाबत माफीही मागितली आहे. 

''एखादी गोष्ट पाहिल्यांदा पाहिल्यावर माझ्यासाठी हास्यास्पद वाटत असली तरी तीच सर्वांसाठी हास्यास्पद असेल असे नाही. मी गेली दहा वर्षे तब्बल दोन हजारांहून जास्त वंचित महिलांच्या सशक्तीकरणाचे काम करत आहे आणि मला कोणत्याही महिलेचा अनादर करायचा नाही. माझ्या प्रतिक्रियेमुळे जर एकही महिला दुखावली गेली असेल तर मी मनापासून माफी मागतो आणि प्रायश्चित म्हणून मी ते ट्विटही डिलीट करत आहे,'' असे ट्विट करत त्याने माफी मागितली आहे.  

ऐश्‍वर्या रायविषयी एक पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध करीत विवेक ओबेरॉयने वाद ओढवून घेतला होता. याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगानेही त्याला नोटीस बजावली आहे. 

ऐश्‍वर्या रॉय हिचे काही वर्षांपूर्वी आधी अभिनेता सलमान खान आणि नंतर विवेक ओबेरॉय यांच्याबरोबर प्रेमसंबंध होते, असे चित्रपटसृष्टीत बोलले जाते. तिने नंतर अभिनेता अभिषेक बच्चन याच्याबरोबर विवाह केला. 

मतदानपूर्व कल चाचणी, मतदानोत्तर कल चाचणी आणि निकाल यांची तुलना करण्यासाठी त्याने ऐश्‍वर्याच्या वैयक्तिक आयुष्यातील या तिन्ही टप्प्यांचा वापर करीत तसे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले. त्याच्या या पोस्टमुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर प्रचंड टीका केली असून, अभिनेत्री सोनम कपूरनेही नाराजी व्यक्त केली आहे. 

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनीही या अवमानजनक पोस्टबद्दल विवेक ओबेरॉयवर टीका केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने त्याला नोटीस बजावत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. विवेक ओबेरॉय याची प्रमुख भूमिका असलेला "पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.

Web Title: Vivek Oberoi apologizes and deletes the tweet against Aishwarya Rai