विषारी वायूनं श्वास गुदमरला, अनेकांचा जीव धोक्यात!

विषारी वायूनं श्वास गुदमरला, अनेकांचा जीव धोक्यात!

विशाखापट्टणम : साखर झोपेत असताना विषारी वायूच्या घुसमटीनं नागरिकांना जाग आली. श्वास गुदमरत असताना एका क्षणासाठी कोरोना विषाणू हवेत पसरल्याची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली. अन् एकच हाहाकार उडाला. हा सर्व प्रकार मध्यरात्र उलटल्यानंतर तीनच्या सुमारास  विशाखापट्टणम येथील नायडू थोटा परिसरात ही घटना घडली. विषारी वायूने श्वास गुदमरु लागल्यानंतर घराच्या टेरिसवर झोपलेली मंडळी घरात घुसली. दारं-खिडक्या बंद करुनही श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने लोक घराबाहेर पडून रात्रीच्या काळोखात सैरावर धावत सुटल्याची परिस्थिती निर्माण झाली.   

जीवाच्या भीतीनं थरकाप उडालेल्या लोकांमधील काही जण नाल्यात पडून जखमी झाले तर काही बेशुद्ध होऊन जमीनीवर कोसळले. या सर्व प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. हा सर्व प्रकार एका केमिकल कंपनीमधील विषारी गॅस लीक झाल्यामुळे निर्माण झाल्याचे काही वेळानंतर लक्षात आले. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला असून  जवळपास 5 हजार लोक आजारी पडल्याचे वृत्त आहे. 

केमिकल कंपनीच्या तीन किलोमीटरच्या परिसरात असलेल्या गावांना या विषारी गॅसचा फटका बसला आहे. शरिरावर भेगा पडणे तसेच डोळ्यांना त्रास होणे अशी लक्षणं याचा प्रादुर्भाव झालेल्या लोकांमध्ये दिसून येत आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान (NDRF) आणि  राज्य आपत्ती निवारण दलाचे जवानांना घटनास्थळी तैनात करण्यात आले असून पोलिस दलाने या परिसातील रहिवाश्यांना घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे.   

विशाखापट्टणम येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क केला असून या घटनेवर मोदी स्वत: लक्ष ठेवून आहेत. गृहमंत्रालय तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकाऱ्यांशी मोदींनी चर्चा केल्याचे समजते.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून या घटनेच्या पार्श्वभूमीवर NDMA ची बैठक बोलवल्याची माहिती दिली असून या परिसरातील लोकांच्या सुरक्षा आणि आरोग्यासाठी मोदींना प्रार्थना देखील केली आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हा सर्व प्रकार घडला त्या कंपनीचे पूर्वीचे नाव हिंदुस्थान पॉलिमर कंपनी असे आहे. 1961मध्ये या कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर 1997 मध्ये या कंपनीला दक्षिण कोरियाच्या एलजी केमिकल या कंपनीने टेकओव्हर केले होते. त्यानंतर कंपनीचे नाव बदलून एलजी पॉलिमर असे ठेवण्यात आले होते. कंपनीत प्लॅस्टिकची निर्मिती केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com