पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

शशिकला यांच्याशी एकनिष्ठ असणारे व निकटवर्तीय मानले जाणारे मंत्री ईडाप्पडी के. पलानीसामी यांची शशिकला यांनी विधानसभेतील पक्षेनेतेपदी निवड केली आहे. 

चेन्नई : बेहिशेबी मालमत्ता जमविल्या शरणागती पत्करून तुरुंगात जाण्यापूर्वी अण्णा द्रमुक पक्षाच्या प्रमुख व्ही.के. शशिकला यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. 

शशिकला यांच्याशी एकनिष्ठ असणारे व निकटवर्तीय मानले जाणारे मंत्री ईडाप्पडी के. पलानीसामी यांची त्यांनी विधानसभेतील पक्षेनेतेपदी निवड केली आहे. 
पलानीसामी हे सध्या तमिळनाडूचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. ते काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांना आव्हान देत मुख्यमंत्रिपदावर दावा सांगतील हे यावरून स्पष्ट झाले आहे. 

बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने एकूण 4 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून, त्वरीत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शशिकला या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाद झाल्या आहेत. त्यांना अजून किमान तीन वर्षे तुरुंगात राहावे लागणार आहे. त्यानंतर आणखी सहा वर्षे म्हणजे एकूण 10 वर्षे त्या निवडणूक लढवू शकणार नाहीत. 

तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांना 1990 च्या दशकात सुमारे 60 कोटी रुपयांहून अधिक बेहिशेबी मालमत्ता जमविण्यात मदत केल्याचा शशिकला यांच्यावरील आरोप सिद्ध झाला. 
 

Web Title: VK Sasikala Expels O Panneerselvam, Picks Loyalist To Lead AIADMK