'यूपी'मध्ये विकासासाठी मत द्या- पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

तुम्ही कधी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला एकत्र पाहिले आहे का? जेव्हा बसप म्हणते की सूर्योदय होत आहे तेव्हा 'सप' म्हणते की सूर्यास्त होत आहे. परंतु 'मोदी हटाओ'वर मात्र दोन्ही पक्ष सहमत आहेत. ते म्हणतात मोदींना हटवा, मी म्हणतो काळा पैसा हटवा-

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

लखनौ- भारताचे भाग्य बदलण्यासाठी पहिली अट ही आहे की आपल्याला प्रथम उत्तर प्रदेशाचे भाग्य बदलावे लागेल. सर्व जाती धर्म विसरून उत्तर प्रदेशच्या विकासासाठी मतदान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लखनौ येथे भाजपच्या वतीने आयोजित परिवर्तन सभेमध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. 
ते म्हणाले, "ही लखनौची भूमी अटलजींची कर्मभूमी आहे. त्यांच्यासारख्या अनेक महापुरुषांनी आपलं तारुण्य या भूमीवर समर्पित केले."

ते पुढे म्हणाले, "काही लोक म्हणतात की, उत्तर प्रदेशातील भाजपचा 14 वर्षांचा वनवास संपेल. परंतु, हा मुद्दा 14 वर्षे वनवासाचा नाही, तर 14 वर्षे उत्तर प्रदेशातील विकासाचा वनवास झाला आहे. दुर्दैवाने हा येथील सत्ताधाऱ्यांचे प्राधान्य विकासाला नाही.
दिल्लीमध्ये आमचं सरकार आलं तेव्हापासून उत्तर प्रदेश सरकारला वित्त आयोगाच्या माध्यमातून जादा निधी मिळाला आहे. पक्षांचे राजकारण पक्षांपुरते मर्यादित राहिले पाहिजे, ते राजकारण जनतेसोबत नाही व्हायला पाहिजे. 

तुम्ही कधी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला एकत्र पाहिले आहे का? जेव्हा बसप म्हणते की सूर्योदय होत आहे तेव्हा 'सप' म्हणते की सूर्यास्त होत आहे. परंतु 'मोदी हटाओ'वर मात्र दोन्ही पक्ष सहमत आहेत. ते म्हणतात मोदींना हटवा, मी म्हणतो काळा पैसा हटवा," असे मोदी म्हणाले. 

"एक पक्ष असा आहे त्यांना परिवाराचे काय होणार याची चिंता आहे. एका पक्षाला चिंता आहे की पैसे कुठे टेवायचे. पैसे वाचविण्यासाठी ते दूर दूरच्या बँका शोधत आहेत. एक पक्ष असा आहे जो आपल्या सुपुत्राला प्रस्थापित करण्यासाठी गेली 15 वर्षे प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यांची अद्यापपर्यंत डाळ शिजली नाही," अशा शब्दांत मोदी यांनी सप, बसप आणि काँग्रेसवर टीका केली. 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले, "उत्तर प्रदेशात जी परिस्थिती आहे त्यावरून समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस हे सर्व घाबरले आहेत असं दिसत आहे. समाजवादी पक्षामध्ये 'दंगल' चालू आहे."
 

Web Title: Vote for the development of Uttar Pradesh, appeals pm modi