डेंगी, चिकुनगुनिया मुक्ततेसाठी मतदान करा : केजरीवाल

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'मलेरिया, डेंगी आणि चिकुनगुनिया मुक्त दिल्लीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'मलेरिया, डेंगी आणि चिकुनगुनिया मुक्त दिल्लीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

दिल्लीतील तीन महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. दिल्लीतील सिव्हिल लाईन्स येथील रस्ते वाहतूक कार्यालयाच्या मतदान केंद्रात कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. यानंतर बोलताना केजरीवाल यांनी दिल्लीला मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया आणि कचरामुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले. केजरीवाल यांनी डेंग्यु आणि चिकुनगुनियासंदर्भात शुक्रवारीही वक्तव्य केले होते. 'जर तुम्ही (दिल्लीकर) भारतीय जनता पक्षाला मतदान केले आणि त्यानंतर तुमच्या घरात कोणी डेंग्यु किंवा चिकुनगुनियाने आजारी पडले तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल. जर भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आला तर पुढील पाच वर्षे दिल्ली अस्वच्छच राहील', असे ते म्हणाले होते.

त्यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने तीव्र टीका केली. 'केजरीवाल यांच्या वक्तव्यातून त्यांच्यावर असलेला दबाव आणि निराशा दिसत आहे. याचा अर्थ असा होतो की त्यांनी त्यांचा पराभव स्वीकारलेला आहे. नागरिक गेल्या दहा वर्षांपासून भाजपला मतदान करत आहेत. या निवडणुकांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुका, गोवा, पंजाब, वाराणसी येथील निवडणुका, लोकसभा निवडणुका या साऱ्यामध्ये केजरीवाल यांना पराभव पत्करावा लागला. त्यांना असे वाटते की दिल्लीचे नागरिक मूर्ख आहेत', अशी टीका भाजप नेते विजय गोयल यांनी केली.

Web Title: Vote in large numbers to make delhi free from dengue, Chikungunya : Kejriwal