वाराणसीत 'मोदीsss...मोदीsss' जयघोष

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

उल्लेखनीय बाब म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीवर विशेष लक्ष दिले होते. त्यांनी तीन प्रचार सभा आणि दोन रोड शो वाराणसीत केले होते. शिवाय, काशी विश्वनाथ आणि काल भैरवी मंदिरात त्यांनी आवर्जून दर्शन घेतले होते. 

वाराणसी : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूक निकालांचा कौल जस जसा समजू लागला, तसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात 'मोदी-मोदी' जयघोष टीपेला पोहोचला आहे. वाराणसीतील पाचही विधानसभा मतदारसंघात भाजपने जवळपास निर्णायक आघाडी घेतली आहे. 

भाजपचे सौरभ श्रीवास्तव यांनी काँग्रेसच्या अनिल श्रीवास्तव यांच्यावर कॅन्टोनमेंट मतदारसंघात आघाडी घेतली. भाजपचे विद्यमान आमदार रविंद्र जैस्वाल बसपच्या सुजीत यांच्यापेक्षा तब्बल दहा हजार मतांनी उत्तर वाराणसीमध्ये आघाडीवर आहेत. 

महत्वाच्या वाराणसी दक्षिण मतदारसंघात भाजपने आठ वेळचे आमदार शामदेव राय चौधरी यांना उमेदवारी नाकारली होती. तेथे निलकांत तिवारी या तुलनेने नव्या चेहऱयाला भाजपने उमेदवारी दिली. तिवारी यांनी काँग्रेसचे माजी खासदार राजेश तिवारी यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. 

सेवापुरी मतदारसंघात भाजपचा सहयोगी पक्ष अपना दलाच्या (सोनेलाल गट) नीलरतन पटेल यांनी सपच्या सुरेंद्र सिंह पटेल यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली आहे. रोहनिया मतदारसंघात भाजपचे सुरेंद्र नरेन सपचे उमेदवार महेंद्र सिंह पटेल यांच्यापेक्षा पाच हजारांवर मतांनी आघाडीवर आहेत. 

उल्लेखनीय बाब म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीवर विशेष लक्ष दिले होते. त्यांनी तीन प्रचार सभा आणि दोन रोड शो वाराणसीत केले होते. शिवाय, काशी विश्वनाथ आणि काल भैरवी मंदिरात त्यांनी आवर्जून दर्शन घेतले होते.

Web Title: #VoteTrendLive: Varanasi chants 'Modi-Modi'