'यूपी' विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या (ता. 11) मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील पश्‍चिम भागातील मुझफ्फरनगर, शामली, गाझियाबादसह इतर संवेदनशील जिल्ह्यांचा यात समावेश असल्याने सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या (ता. 11) मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील पश्‍चिम भागातील मुझफ्फरनगर, शामली, गाझियाबादसह इतर संवेदनशील जिल्ह्यांचा यात समावेश असल्याने सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पंधरा जिल्ह्यांत विस्तारलेल्या एकूण 76 मतदारसंघांत हे मतदान होणार असून, त्यासाठी तब्बल 836 उमेदवार रिंगणात आहेत. या वेळी 2 कोटी 59 लाखपेक्षा अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील असा अंदाज असून, त्यासाठी 14 हजार 514 मतदान केंद्रांची (बूथ) व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या गाझियाबाद जिल्ह्यातील साहिबाबाद या मतदारसंघात सर्वाधिक 8 लाख 36 हजार 214 मतदार असून येथे 835 बूथद्वारे मतदान पार पडणार आहे. येथील जनता कोणाला संधी देणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपैकी 20 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल असून 36 टक्के उमेदवार हे कोट्यधीश आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप, बसपसह आघाडी केलेल्या समाजवादी पक्ष व कॉंग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पहिल्या टप्प्यातील काही मतदारसंघांत भाजपविरुद्ध बसप अशी थेट लढत होणार असून, समाजवादी पक्ष- कॉंग्रेस आघाडी, तसेच राष्ट्रीय लोक दलाकडून आश्‍चर्यकारक प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

चोख बंदोबस्त
दंगली, हिंसाचारामुळे चर्चेत असलेल्या संवेदनशील ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस व निमलष्करी दलाचे सुमारे 2 लाख कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व बूथवर सीसीटीव्ही कॅमेरे लावून व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. पूर्ण मतदानप्रक्रियेवर हवेतून नजर ठेवली जाणार असून, त्यासाठी ड्रोन व हेलिकॉप्टरही तयार ठेवण्यात आले आहे.

लक्षवेधक लढती
- नोएडा - पंकज सिंह (गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे चिरंजीव)
- अतरौली - संदीप सिंह (माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे नातू)
- कैराणा ः मृगंका सिंह (भाजप खासदार हुकूम सिंह यांची मुलगी)
- सरधाना ः संगीत सोम (मुझफ्फरनगर दंगलप्रकरणी संशयित)
- ठानाभवन ः सुरेश राणा (मुझफ्फरनगर दंगलप्रकरणी संशयित)

Web Title: voting for up polls