राजेश भारतीसह तीन गुंडांचा खात्मा

वृत्तसंस्था
रविवार, 10 जून 2018

राजधानीतील मोस्ट वॉंटेड कुख्यात गुंड राजेश भारती आज सकाळी दक्षिण दिल्लीत झालेल्या चकमकीत मारल्या गेला असून, त्याच्याच टोळीतील अन्य तीन सदस्यांनाही ठार मारण्यात पोलिसांना यश आले.

नवी दिल्ली : राजधानीतील मोस्ट वॉंटेड कुख्यात गुंड राजेश भारती आज सकाळी दक्षिण दिल्लीत झालेल्या चकमकीत मारल्या गेला असून, त्याच्याच टोळीतील अन्य तीन सदस्यांनाही ठार मारण्यात पोलिसांना यश आले. छतरपूर येथील "छन्नन होला' या खेड्याजवळ ही चकमक झाली. दहशतवादविरोधी कारवायांसाठी तैनात करण्यात आलेल्या "स्पेशल सेल'ला येथील एका फार्महाउसवर भारती आणि त्याचे सहकारी असल्याची माहिती मिळाली होती, यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना शरण येण्याचे आदेश दिले, पण गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केल्याने पोलिसांना देखील प्रत्युत्तरादाखल गोळीबार करावा लागला. 

राजेश भारतीसोबत या चकमकीमध्ये मारल्या गेलेल्या अन्य गुंडांची नावे विद्रोह, उमेश डॉन आणि भिकू अशी आहेत. या वेळी पोलिस आणि हल्लेखोर गुंडांमध्ये पिस्तुलाच्या जवळपास 35 फैरी झाडल्या गेल्या. यामध्ये अन्य चार पोलिस अधिकारीदेखील जखमी झाले आहेत. ज्या "फोर्ड एंडेव्हर' गाडीमधून भारती आणि त्याचे साथीदार प्रवास करत होते त्याच गाडीतून पोलिसांनी अर्ध स्वयंचलित पिस्तुले जप्त केली आहेत. दिल्लीतील टॉप टेन दहशतवाद्यांच्या यादीमध्ये भारतीचा समावेश होता. मागील वर्षी हरियाना पोलिसांनी त्याला अटक केली होती. पण यानंतर तो त्यांच्या ताब्यातून निसटला होता. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. भारतीविरोधात खून, खंडणी आणि दरोडे याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

Web Title: Wanted gangster Rajiv Bharti, three criminals killed in South Delhi