खुद्द खासदारांच्याच घरांतच रोज हजारो लीटर पाण्याची नासाडी!

water
water

नवी दिल्ली : पाण्याचा थेंब न थेंब वाचवा, जलसंवर्धन ही लोकचळवळ बनावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार करत आहेत. मात्र खुद्द दिल्लीत ल्यूटियन्स भागातील सरकारी बंगले व आलिशान सदनिकांत राहणाऱया मंत्री व खासदारांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी बसविलेल्या आरो यंत्रांमुळे दररोज  अक्षरशः हजारो लीटर पाणी वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव राज्यसभेत आज समोर आले. 

जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांनी संबंधित प्रश्नकर्त्या खासदारांचे अभिनंदनही केले व पाणीबचतीबाबत देशाच्या सर्वांत मोठ्या पंचायतीतील तब्बल सुमारे 800 माननीय लोकप्रतीनिधींचीच स्थिती दिव्याखाली अंधार अशी असल्याचेही अप्रत्यक्षपणे मान्य केले.

संसदेत 800 लोकप्रतीनिधी आहेत. त्या प्रत्येकाकडे घरचे व अभ्यागत यांच्यासाठी रोज किमान 30 लीटर शुध्द पाणी लागते असे गृहीत धरले तरी हे 24 हजार लीटर पाणी मिळविण्यासाठी त्याच्या चौपट म्हणजे  किमान 96 हजार ते 1 लाख लीटर पाणी रोज वाया जाते काय, असाही सवाल यातून निर्माण झाला आहे. सरकारी घरांतच राहणारे हजारो सरकारी अधिकारी यात धरलेले नाहीत.

राज्यसभेत आज देशाच्या विविध भागांत पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईबाबतचा प्रश्न होता. जदयूच्या कहेकशा परवीन यांनी याच्या उपप्रश्नात सांगितले की दिल्लीतील खासदारांचे बंगले व सदनिकांत पाणी शुध्दीकरणासाठी आरो यंत्रे बसविण्यात आली आहेत. पंतप्रधान जलसंवर्धनाबाबत मन की बात पासून देशातील सर्व सरपंचांना पत्रए लिहीण्यापर्यंत विविध मार्गांद्वारे पाणीबचतीचे कळकळीचे आवाहन करतात. मात्र या बंगल्यांमध्ये व फ्लॅटस्मध्ये बसविलेल्या आरो यांत्रांतून एक लीटर शुध्द पाणी मिळण्यासाठी चार लीटर पाणी अक्षरशः वाया जाते. जलसंवर्धनाची सुरवात आम्ही (मंत्री व खासदारांनी) आमच्या घरापासूनच का करू नयेय़ असा भेदक सवाल त्यांनी विचारला.

जलशक्ती मंत्रालयाचे पहिले मंत्री गजेंद्र शेखावत यांनी परवीन यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की बंगल्यांत आरो यंत्रे का बसविण्याचा आग्रह होतो, तर पूर्वीच्या सरकारांचा कारभार असा की आम्हाला आमच्याच यंत्रणेबद्दल अविश्वास वाटू लागला आहे. खरे तर दिल्लीच्या काही भागांतील नळाद्वारे येणाऱया पाण्याचे सर्वेक्षण मध्यंतरी केले तेव्हा दिल्लीतील पाण्याचा मानक दर्जा हा युरोपातील पाण्याच्या पेक्षा चांगला असल्याचे सिध्द झाले होते. आता खासदारांनी पाण्याची ही नासाडी थांबविण्यासाठी स्वतःच्या घरापासून आरो काढून टाकून सुरवात करावी असेही आवाहन त्यांनी परवीन यांच्याकडे पहात केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com