आमदार निवासात पाणीटंचाई - आ. हेमंत पाटील

ब्रह्मदेव चट्टे
शनिवार, 1 एप्रिल 2017

वाढत्या उन्हामुळे राज्यभरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू असताना राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुंबईत आलेल्या आमदारांनाही पाणी टंचाईच्या झळा बसल्या आहेत. शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी आज (शनिवार) हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला.

मुंबई - वाढत्या उन्हामुळे राज्यभरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू असताना राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुंबईत आलेल्या आमदारांनाही पाणी टंचाईच्या झळा बसल्या आहेत. शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी आज (शनिवार) हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनच्या निमित्ताने बहुतेक आमदार सध्या मुंबईत वास्तव्याला आहेत. मनोरा आमदार निवासात दोन दिवसापासून पाणीटंचाई जाणवत आहे. आमदार पाटील यांनी हा मुद्दा आज (शनिवार) विधानसभेत उपस्थित केला. मनोरा आमदार निवासातील पाणी संपल्याने अंघोळ न करता विधानसभेच्या पवित्र सभागृहात यावे लागत असल्याचे सांगत आमदार निवासाच्या समुद्राकडील जागा हागदारीमुक्त करण्याची मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, 'विधानसभेसारख्या पवित्र सभागृहात आम्हाला अंघोळ न करता यावे लागत आहे. मनोरा आमदार निवासाच्या समुद्राकडील बाजूच्या झोपडपट्टीत लोक उघड्यावर शौचास बसतात. आमदारांना सकाळी नको ते दर्शन घडते. तशाच अवस्थेत तेथे मासेमारी चालते. त्यामुळे आमदार निवास परिसर तातडीने हागदारी मुक्त करावा', अशी मागणी त्यांनी केली.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना तुम्ही समुद्राच्या दिशेने पाहू नका असा सल्ला देत पाटील यांनी या प्रकरणी सरकार गंभीर नसल्याचेच निदर्शनास आणून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी "स्वच्छ भारत अभियाना'च्या पार्श्‍वभूमीवर आमदार निवास परिसरातच अशी अवस्था असल्याचे समोर आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Water drought in MLA residence - Hemant Patil