झेलमची पातळी घसरली 

यूएनआय
रविवार, 1 जुलै 2018

काश्‍मीर खोऱ्यात पडणाऱ्या पावसाने कालपासून विश्रांती घेतल्याने आणि आज हवामानात सुधारणा झाल्याने झेलम नदीची पातळी घसरत आहे. असे असले तरी झेलम आणि तिच्या उपनद्या अद्याप धोक्‍याच्या पातळीवर वाहत आहेत.

श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात पडणाऱ्या पावसाने कालपासून विश्रांती घेतल्याने आणि आज हवामानात सुधारणा झाल्याने झेलम नदीची पातळी घसरत आहे. असे असले तरी झेलम आणि तिच्या उपनद्या अद्याप धोक्‍याच्या पातळीवर वाहत आहेत.

वेधशाळेने म्हटले, की काश्‍मीर खोऱ्यात कालच्यापेक्षा रविवारी हवामानात सुधारणा झाली आहे. मात्र अजूनही पावसाची शक्‍यता आहे. सोमवार सायंकाळपासून ते चार जुलैपर्यंत पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मात्र या स्थितीने घाबरण्याची गरज नाही, असे वेधशाळेने म्हटले आहे. पूरनियंत्रक कक्षाने झेलमच्या पातळीत घसरण होत असल्याचे आज सांगितले. दक्षिण काश्‍मीरमधील संगम येथे आज सकाळी 19.23 फूट पातळीवरून वाहत असल्याची नोंद करण्यात आली. काल झेलम नदी 23 फुटांच्या पातळीवरून वाहत होती. त्याचवेळी राम मुन्शी बाग येथे हीच पातळी 23.13 फूट इतकी नोंदली गेली. 21 फूट पातळी ही धोकादायक मानली जाते. दरम्यान, दक्षिण आणि मध्य काश्‍मीरमध्ये काल रात्रीपासून पाऊस थांबल्याने नदीचा स्तर कमी होत चालला आहे. 

राजनाथसिंह यांचे मदतीचे आश्‍वासन 
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज सकाळी जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांना राज्यातील पूरस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्राकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. राज्यापालांसमवेत दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेदरम्यान राजनाथसिंह यांनी काश्‍मीरमधील पूरस्थितीची माहिती घेतली. गेल्या दोन दिवसांत पावसामुळे काश्‍मीरमध्ये तिघांचे बळी गेले आहेत. तसेच जम्मू-श्रीनगर महामार्गावरची वाहतूकही थांबवली होती. 

Web Title: water level of jhelam river decrease