तमिळनाडूच्या संस्कृतीचा अभिमान - मोदी

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जानेवारी 2017

नागरिकांच्या सांस्कृतिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकार तमिळनाडूच्या विकासासाठी कटीबद्ध आहे. 

नवी दिल्ली - तमिळनाडूमध्ये 'जलिकट्टू'च्या समर्थनार्थ जोरदार आंदोलन सुरू असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तमिळनाडूच्या समृद्ध संस्कृतीचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.

मोदींनी आज (शनिवार) ट्विट करताना म्हटले, की नागरिकांच्या सांस्कृतिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकार तमिळनाडूच्या विकासासाठी कटीबद्ध आहे. 

केंद्र सरकारने जलिकट्टूच्या समर्थनार्थ तमिळनाडू सरकारने मंजूर केलेल्या अध्यादेशास मंजुरी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून तमिळनाडूमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक जनजीवन विस्कळित झाले आहे. मध्यंतरी याच मागणीवरून मुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. राज्य सरकारच्या अध्यादेशास केंद्रीय गृह, कायदा आणि पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली असून, बैलाला आता कसरती करणाऱ्या प्राण्यांच्या श्रेणीतून वगळण्यात आले आहे. यामुळे प्राणी क्रूरता कायद्यातील तरतुदी येथून पुढे बैलास लागू होणार नाहीत. हा अध्यादेश राष्ट्रपतींसमोर सादर न करता तो थेट राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने दिली. 
 

Web Title: We are very proud of the rich culture of Tamil Nadu says Narendra Modi