ड्रग्ज नामशेष करण्यासाठी आम्ही अपयशी - पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

राज्यातून ड्रग्जना नामशेष करण्यासाठी लोक, पोलिस यांच्यासह आम्ही सर्वजणही अपयशी ठरलो' असल्याची कबुली गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी दिली. 
 

पणजी - 'मटका ही खूप लहान गोष्ट आहे. मटक्‍यापेक्षा अधिक घातक ड्रग्जने मांडलेली थैमान ही समस्या आहे. राज्यातून ड्रग्जना नामशेष करण्यासाठी लोक, पोलिस यांच्यासह आम्ही सर्वजणही अपयशी ठरलो' असल्याची कबुली गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी दिली. 

आम्हाला मटका आणि ड्रग्जबाबतची जी माहिती मिळते, ती फोनच्या माध्यमातून आम्ही पोलिसांपर्यंत पोचवतो. मटका आणि जुगार बंद व्हावा, असे मला वाटत असले तरी ड्रग्जना त्वरित आळा घालणे ही काळाची गरज झाली आहे, अन्यथा हे ड्रग्ज एकेदिवशी प्रत्येक घराघरांत पोचून महिलांचे संसार उध्वस्त करून आमची पिढी बरबाद करतील, असेही मंत्री आजगावकर म्हणाले. 

राज्यातील पोलिस यंत्रणाही खिळखिळी झाली आहे. मटक्‍याचे अड्‌डे पोलिसांना माहीत असायलाच हवेत, आणि माहीत पडल्यानंतर त्यांनी छापे टाकायला हवेत. राज्यात असणारे मटक्‍याचे अड्‌डे तसेच ड्रग्ज मिळण्याची ठिकाणी ज्यांना माहीत असतील त्यांनी त्यांचे पत्ते आम्हाला द्यावेत, त्या ठिकाणांवर आणि व्यक्‍तींवर आम्ही त्वरित कारवाई करू. लोकांकडे जर याबाबतीत काही सल्ले असतील तर ते ही दिल्यास आम्ही त्याचे स्वागत करू असेही मंत्री आजगावकर म्हणाले. 

गॉडफादर कोण हेच माहीत नाही... 

मटक्‍याच्या मागे कोणीतरी गॉडफादर आहे पण तो कोण आहे हे आम्हालाही माहीत नाही. काँग्रेसचे आमदार मटक्‍यावर वरदहस्त असणाऱ्या ज्या मंत्र्यांबाबत बोलतात, त्यांनी त्या मंत्र्याचे नाव खुलेआमपणे घ्यावे. शक्‍यता सांगून कोणाचेही नाव न घेता त्यांनी लोकांची, सरकारची आणि प्रसारमाध्यमांचीही दिशाभूल करू नये, असा टोलाही मंत्री आजगावकर यांनी लगावला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: We fail to extract drugs said Tourism Minister Manohar Ajagaonkar