आम्ही सबका साथ, सबका विकासाचे सूत्र साकारले : अमित शहा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

''भारतीय लोकशाहीच्या इतिहासात भाजप कार्यकर्त्यांनी सर्वाधिक बलिदान दिले आहे. आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कमळ फुललेले दिसत आहे. हा प्रवास अत्यंत कठीण होता. पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी मोठी मेहनत घेतल्यामुळे आज हा दिवस आपण पाहू शकलो''. 

- अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप

मुंबई : दहा सदस्यांनी सुरु केलेल्या भारतीय जनता पक्षाचे आज देशभरात 11 कोटी सदस्य आहेत. त्यामुळे भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. देशातील गरीब जनतेच्या कल्याणासाठी सत्तेला साधन बनविण्याचा आमचा विचार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीबांच्या घरात सुख पोचविण्याचे काम केले. त्यांनी सबका साथ, सबका विकासाचे सूत्र साकार केले, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.

भाजपच्या 38 व्या वर्धापन दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातील महामेळाव्यादरम्यान भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या महामेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. 

शहा म्हणाले, ''भारतीय लोकशाहीच्या इतिहासात भाजप कार्यकर्त्यांनी सर्वाधिक बलिदान दिले आहे. आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कमळ फुललेले दिसत आहे. हा प्रवास अत्यंत कठीण होता. पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी मोठी मेहनत घेतल्यामुळे आज हा दिवस आपण पाहू शकलो''. 

यावेळी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी पवार साहेबांसोबत बसत आहेत. काँग्रेसने देशासाठी काय केले ? राहुलबाबा तुम्ही साडेचार वर्षांचा हिशोब मागता ? देशाची जनता तुमच्याकडे चार पिढयांचा हिशोब मागत आहे. तुम्ही इतकी वर्ष सत्ता असून काय केले ? असा सवाल त्यांनी विचार केला. उज्ज्वला योजना, मेडिक्लेम अशा योजनांमधून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लाभ पोचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे शहा यांनी सांगितले. 

Web Title: we maintained SAB KA SATH SABKA VIKAS says amit shah