देशात बंदी नको; संवाद हवा: कमल हसन

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

आपला देश हा लोकशाही व्यवस्था असलेला देश आहे. या देशात कशावर बंदी नको. बंदीऐवजी आपल्याला संवाद व चर्चेची आवश्‍यकता आहे

चेन्नई - तमिळनाडुमधील जल्लिकट्टू या बैलांच्या पारंपारिक खेळावर सर्वोच्च न्यायालयाकडून घालण्यात आलेल्या बंदीस ठाम विरोध केलेले प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी आपला सर्व प्रकारच्या बंदींस विरोध असल्याचे आज (मंगळवार) स्पष्ट केले. जल्लिकट्टू असो; वा माझे चित्रपट, माझा कोणत्याही प्रकारच्या बंदीस विरोधच आहे, असे हसन यांनी सांगितले.

"एम जी रामचंद्रन हे जर आज मुख्यमंत्री असते; तर त्यांनी "मरिना बीच'वर येऊन आंदोलकांशी संवाद साधला असता. मला मोर्चामधील महिला व लहान मुलांची काळजी वाटत होती. परंतु, महिला व लहान मुले तेथे आनंदी व सुरक्षित होती. आपला देश हा लोकशाही व्यवस्था असलेला देश आहे. या देशात कशावर बंदी नको. बंदीऐवजी आपल्याला संवाद व चर्चेची आवश्‍यकता आहे,'' असे हसन म्हणाले.

जल्लिकट्टूवर घालण्यात आलेल्या बंदीस हसन यांनी ट्विटरच्या माध्यमामधून ठाम विरोध दर्शविला होता. न्यायालयाने जल्लिकट्टूवर घातलेल्या बंदीचे तमिळनाडू व राज्याची राजधानी असलेल्या चेन्नईमध्ये तीव्र पडसाद उमटले होते.

Web Title: we need dialogue instead of bans, says Kamal Haasan