देशाच्या संघर्षमय इतिहासाची आठवण ठेवावी : राष्ट्रपती 

उज्ज्वल कुमार (सकाळ न्यूज नेटवर्क)
मंगळवार, 18 एप्रिल 2017

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यसैनिकांची भूमिका मोठी होती. आज आपण त्यांच्याबरोबर आहोत हे आपले सौभाग्य आहे,'' असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी येथे केले. देशाच्या संघर्षमय इतिहासाची आठवण आपण कायम ठेवली पाहिजे. स्वतंत्र भारताचे स्वप्न या स्वातंत्र्यसैनिकांनी पूर्ण केले, असेही ते म्हणाले. 

पाटणा- "देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यसैनिकांची भूमिका मोठी होती. आज आपण त्यांच्याबरोबर आहोत हे आपले सौभाग्य आहे,'' असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी येथे केले. देशाच्या संघर्षमय इतिहासाची आठवण आपण कायम ठेवली पाहिजे. स्वतंत्र भारताचे स्वप्न या स्वातंत्र्यसैनिकांनी पूर्ण केले, असेही ते म्हणाले. 

स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मुखर्जी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे कौतुक केले. महात्मा गांधी यांनी चंपारण्यात केलेल्या निळीच्या सत्याग्रहाला 10 एप्रिल रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त देशातील दोन हजार 972 स्वातंत्र्यसेनानींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राज्य सरकारने केले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हेही उपस्थित राहणार होते; मात्र या कार्यक्रमावरून राजकारण केल्याचा आरोप करत त्यांनी येथे येण्यास नकार दिला. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी या वेळी आवर्जून उपस्थित होते. 

नितीश कुमार या प्रसंगी म्हणाले, की 1917 मधील चंपारण्य सत्याग्रहापासूनच पारतंत्र्यात असलेल्या आपल्या देशात एक वातावरणनिर्मिती झाली. यानंतर गांधीजींनी अनेक आंदोलने केली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. राहुल गांधी म्हणाले, ""ज्यांच्याकडे सत्ता आहे, ती त्यांच्याकडेच राहावी, हे आवश्‍यक नाही. गांधीजी येथे आले आणि जनतेत मिसळले. येथील सत्य जाणल्यानंतर तसेच जालियनवाला बागेतील हत्याकांड पाहिल्यावर स्वातंत्र्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, हे त्यांनी जाणले.'' 

'कोणाविषयी काहीही तक्रार नाही' 
गृहमंत्री राजनाथसिंह या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत, हा मुद्दा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाषणातून मांडला. ते म्हणाले, "राजनाथसिंह यांना निमंत्रण दिले होते; पण ते आले नाहीत. मला कोणाविषयी काहीही तक्रार नाही.'' राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हेही सत्कार समारंभात सहभागी झाले होते. राजनाथसिंह यांच्या अनुपस्थितीबद्दल ते म्हणाले, की कार्यक्रमाला यायचे नव्हते, तर त्यांनी प्रथम होकार का दिला. देशातील परिस्थिती कठीण आहे. स्वातंत्र्याची मूल्ये, स्वप्नांना लाथाडले जात आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. 
 

Web Title: we should always remember India's struggle