बीएसएफ जवानाच्या व्हिडिओने देशभर खळबळ 

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

जेवणाबाबत मी अनेकवेळा कमांडरला सांगितले पण काहीच होत नाही. खूप धाडस करून मी हा व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओतील सत्याची चौकशी करा, सर्व समोर येईल. व्हिडिओ व्हायरल झाला असून, देश माझ्याबरोबर आहे. जवान आणि माझ्या बटालियनचा मला पाठिंबा आहे.

नवी दिल्ली - सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने (बीएसएफ) व्हिडिओद्वारे लष्कराची लक्तरे वेशीवर टांगत, दररोज मिळत असलेल्या जेवणाचा दर्जा व्हिडिओतून सर्वांसमोर आणला. सीमेचे संरक्षण करताना निकृष्ट जेवण मिळत असल्याने अनेकवेळा उपाशी झोपत असल्याचेही समोर आणले. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली असून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील सीमेवर हा व्हिडिओ शूट केला आहे. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, विरोधी पक्षांकडूनही सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तेज बहादूर यादव या जवानाने थेट लष्करी अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप केले आहेत. बीएसएफचे माजी प्रमुख प्रकाश सिंह यांनी जवानाच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

तेज बहादूर यांनी व्हिडिओतून काही धक्कादायक गोष्टी समोर आणल्या आहेत. त्याने या व्हिडिओत म्हटले आहे, की सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेले सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकतात. अनेकवेळा तर उपाशी झोपावे लागते. आम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सलग 11 तास या बर्फात उभे राहून कर्तव्य बजावतो. पाऊस असो, वारा असो कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य पार पाडतो.

जेवणाबाबत मी अनेकवेळा कमांडरला सांगितले पण काहीच होत नाही. खूप धाडस करून मी हा व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओतील सत्याची चौकशी करा, सर्व समोर येईल. व्हिडिओ व्हायरल झाला असून, देश माझ्याबरोबर आहे. जवान आणि माझ्या बटालियनचा मला पाठिंबा आहे, असे तेज बहादूर यादव यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: We Sleep On Empty Stomach: BSF Soldier Video Seizes Government's Attention

व्हिडीओ गॅलरी