Bring Back Abhinandan : घाबरू नका! कारगिल युद्धातही असंच झालं होतं.. अभिनंदन परत येतील! 

nachiket
nachiket

नवी दिल्ली : भारतीयांसाठी बुधवारचा दिवस म्हणजे 'रोलर कोस्टर राईड' होता.. सकाळी पाकिस्तानची विमाने भारतीय हद्दीत घुसली आणि त्यापैकी एक विमान भारतीय हवाई दलाने पाडले, असे वृत्त झळकले.. त्यानंतर भारतीयांचा जल्लोष कालच्यासारखाच 'टॉप'वर होता.. पण या कारवाईमध्ये आपलेही एक विमान पडले आणि त्यात भारताचा एक वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात सापडला, असे वृत्त दुपारनंतर पसरले आणि अचानक देशाचा मूडच बदलला.. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुरक्षेसाठी देशभरातून प्रार्थना सुरू झाली.. पण अभिनंदन नक्कीच सुखरूप परत येतील.. याचे उदाहरण म्हणून 1999 च्या कारगिल युद्धाचा दाखला दिला जात आहे.. 

घटना आहे 1999 मधील.. भारत-पाकिस्तान या दोन देशांमध्ये कारगिल युद्ध सुरू होते.. त्या युद्धामध्ये भारताने हवाई दलाचाही वापर केला होता. पाकिस्तानी घुसखोरांचा एक अड्डा उध्वस्त करण्याची जबाबदारी हवाई दलाच्या काही वैमानिकांकडे सोपविण्यात आली होती.. 26 वर्षीय फ्लाईट लेफ्टनंट के. नचिकेत यांचा त्यात समावेश होता.. बाकी लक्ष्यभेद नियोजनानुसार झाला; पण त्या दरम्यान नचिकेत यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे नचिकेत यांना विमानातून 'इजेक्‍ट' व्हावे लागले. जमिनीवर आल्यानंतर काही काळ त्यांनी पाकिस्तानी सैन्यापासून स्वत:चा बचाव केला; पण काही वेळाने पाकिस्तानच्या एका गस्ती पथकाने नचिकेत यांना घेरले. 

नचिकेत यांना अटक केल्यानंतर त्यांना एका गोपनीय ठिकाणी ठेवण्यात आले. एकूण आठ दिवस ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यांच्या अटकेविषयी भारताला अधिकृत माहिती देण्यात आली. त्यानंतर दोन्ही देशांममध्ये राजनैतिक पातळीवर हालचाली सुरू झाल्या. भारताचे पाकिस्तानमधील तत्कालीन उच्चायुक्त जी. पार्थसारथी यांनी यात मोलाची भूमिका बजावली. 

पाकिस्तानला पार्थसारथी यांनी जीनिव्हा करारातील तरतुदींची आठवण करून दिली. युद्धामध्ये पकडल्या गेलेल्या कैद्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीविषयी जीनिव्हा कराराद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर काही निकष ठरविण्यात आले आहेत. या निकषांची जाणीव भारताने पाकिस्तानला करून दिली. त्यानंतर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी नचिकेत यांच्या मुक्ततेची घोषणा केली. 

भारतात दाखल झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी स्वत: नचिकेत यांचे स्वागत केले होते. 

आता 20 वर्षांनी भारतासमोर पुन्हा असाच प्रसंग उभा ठाकला आहे. भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेचे आता राजनैतिक अधिकाऱ्यांचे लक्ष्य आहे. जीनिव्हा करारातील तरतुदींचा आधार घेत अभिनंदन लवकरच पुन्हा भारतात परततील, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com