भाजपविरोधात इंच-इंच लढवू : राहुल गांधी

rahul
rahul

नवी दिल्ली : काँग्रेसचे 52 खासदार भाजपशी प्रत्येक इंचावर झुंजतील. भाजपला दररोज नाचविण्यासाठी एवढे संख्याबळ पुरेसे आहे. ते आपला द्वेष करतील, शिव्या देतील, आपल्यावर संताप करतील; पण याचा आनंद घ्या, असे आवाहन करतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवनिर्वाचित खासदारांना आक्रमक होण्याची सूचना केली. हा काळ आत्मपरीक्षणाचा आणि परिवर्तनाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत राहुल यांनी खासदारांना हा लढाईचा नवा मंत्र दिला. या वेळी पक्षाच्या संसदीय नेतेपदी सोनिया गांधी यांची पुन्हा निवड करण्यात आली. 

दरम्यान, काँग्रेसने तसेच राहुल गांधींनी ट्‌विट करून सोनिया गांधींचे अभिनंदन केले. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मजबूत आणि परिणामकारक विरोधी पक्षाची भूमिका पार पाडेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. संसदेत भारतीय जनता पक्षाला वर्चस्व गाजवू दिले जाणार नाही. राज्यघटनेच्या आणि संस्थांच्या रक्षणासाठी काँग्रेसचे 52 खासदार सिंहासारखे लढतील, असे राहुल यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. 

संसदेमध्ये मोदी सरकारचा सामना करण्यासाठी काँग्रेसने पुन्हा एकदा सोनिया गांधींकडेच संसदीय पक्षाचे नेतृत्व सोपविले आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या पदावर सलग चौथ्यांदा सोनिया गांधींची निवड झाली आहे. संसद भवनातील केंद्रीय कक्षात (सेंट्रल हॉल) काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली. लोकसभेतील नवनिर्वाचित 52 खासदारांसोबतच राज्यसभेतील खासदारदेखील या वेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत राहुल गांधींच्या राजीनामा नाट्यानंतरची पक्षाची ही पहिलीच बैठक होती. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोनिया गांधींच्या नावाचा प्रस्ताव दिल्यानंतर सर्वसंमतीने त्यांना नेता निवडण्यात आले. 2014 पासून या पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सोनिया गांधींना पुन्हा एकदा संसदीय पक्षनेतेपद मिळाले आहे.

या वेळी सोनिया गांधींनी पक्ष खासदारांना मार्गदर्शन करताना काँग्रेसवर विश्‍वास ठेवून मतदान करणाऱ्या साडेबारा कोटी मतदारांचे आभार मानले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा पक्षाच्या विचारसरणीवर परिणाम झालेला नाही. आपल्यासमोर आदर्श आहेत. आपण सरकारच्या सकारात्मक निर्णयांना पाठिंबा देऊ; परंतु आपल्या विरोधात सरकारने काम केले तर शेवटच्या श्‍वासापर्यंत संघर्ष करू, असेही सोनिया म्हणाल्या. 
संसदेचे अधिवेशन 17 जूनपासून सुरू होणार आहे. 543 सदस्य संख्या असलेल्या लोकसभेमध्ये कॉंग्रेसचे फक्त 52 खासदार निवडून आल्यामुळे या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. 

लोकसभेतील नेता कोण? 
काँग्रेसने संसदीय पक्षनेत्याची आज निवड केली असली, तरी लोकसभेतील गटनेत्याची निवड बाकी आहे. काँग्रेसच्या सुधारित घटनेनुसार संसदीय पक्षाचा नेता गटनेत्याची नियुक्ती करतो. स्वतः राहुल गांधी हे पद स्वीकारणार की अन्य नेत्याकडे हे पद सोपविणार याबाबत अंदाज लढविले जात आहेत.

काँग्रेसच्या अन्य खासदारांमध्ये या पदासाठी मनीष तिवारी आणि शशी थरूर या दोन नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. लवकरच याबाबतचा निर्णय कळविला जाईल, असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com