प्रादेशिक पक्षांशी युती करून लोकसभा निवडणुक लढवणार - केंद्रीयमंत्री मुख्तार नक्वी

विलास महाडिक 
रविवार, 3 जून 2018

केंद्र सरकारने केलेला विकास हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा असेल असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी स्पष्ट केले. 

पणजी - भाजप प्रादेशिक पक्षांशी युती करून आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढविणार आहे. ते निवडणूक नेते असतील. केंद्र सरकारने केलेला विकास हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा असेल असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी स्पष्ट केले. 

गेल्या चार वर्षात भाजप आघाडी सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात करण्यात आलेल्या विकासकामांची तसेच केलेल्या आश्वासनपूर्तीचा आढावा घेत केंद्रीयमंत्री नक्वी म्हणाले की, देशातील गरीब जनता तसेच अल्पसंख्यांकाकडे सरकारने लक्ष दिले आहे. प्रत्येक घराघरामध्ये वीज पोहचविण्यात आली आहे, श्रीमंतांना स्वयंपाक गॅसवरील अनुदान न घेण्याचे आवाहन करून दुर्बल घटकांतील जनतेला उज्ज्वला योजनेद्वारे 4 कोटी मोफत गॅस कनेक्शने देण्यात आली. कोणताही भेदभाव न करता विकास केला आहे व सन्मानतून सशक्तीकरण करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार विनय तेंडुलकर, गोवा अल्पसंख्याक विकास महामंडळाचे ओर्लांडो मिनेझिस व के. श्यामा प्रसाद उपस्थित होते. 

गेल्या चार वर्षात केंद्र सरकारने 431 विविध थेट लाभार्थी योजना लोकापर्यंत पोहचवल्या आहेत. स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया या माध्यमातून विकासाबरोबर रोजगार व रोजगार संधी उपलब्ध केल्या आहेत. मागील सरकारमध्ये ढासळलेली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम या केंद्र सरकारने केले आहे. लोकांमध्ये विश्वास व स्थिर सरकार दिले आहे तसेच जगामध्ये भारत देशाची प्रतिमा उंचावली आहे. इतर देशही आता भारत देशाकडे शक्तिशाली देश म्हणून पाहू लागले आहे व याचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वाला जाते असे नक्वी यांनी सांगितले. 

यूपीएमध्ये पंतप्रधानसाठी डझनभर उमेदवार -
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोदीविरोधात काही पक्ष युती करत आहे. त्यांच्या या यूपीएमध्ये डझनभर पंतप्रधानाचा उमेदवार समजत आहे मात्र एनडीएमध्ये या पदासाठी नरेंद्र मोदी हे एकमेव उमेदवार आहेत. देशातील विकासाबाबत लोक मोदी यांच्या बाजूने आहेत. हे सरकार मित्रपक्षांना बरोबर घेऊन विकास करणारा पक्ष आहे व दिलेली आश्वासने पाळण्यासाठी कटीबद्ध असलेला पक्ष आहे असे केंद्रीयमंत्री नक्वी यांनी स्पष्ट केले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: We will fight for Lok Sabha elections alliance with regional parties