पाकिस्तानकडून वर्षभरात २००० वेळा शस्त्रसंधीभंग

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या युद्धाच्या धमक्‍या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने नियंत्रणरेषेवर होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर गंभीर चिंता व्यक्त केली. कुरापतखोर पाकिस्तानने या वर्षात दोन हजारहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी नियंत्रणरेषेवर भारतीय चौक्‍यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या युद्धाच्या धमक्‍या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने नियंत्रणरेषेवर होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर गंभीर चिंता व्यक्त केली. कुरापतखोर पाकिस्तानने या वर्षात दोन हजारहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी नियंत्रणरेषेवर भारतीय चौक्‍यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानचा खोटेपणा उघड पाडणारे छोटेखानी निवेदनच आज जारी केले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान केवळ घुसखोरीच्या उद्देशाने जम्मू-काश्‍मीरमध्ये नियंत्रणरेषेवर भारतीय चौक्‍यांना लक्ष्य करीत आहे. पाकिस्ताने या वर्षभरात कोणत्याही कारणाविना २०५० हून अधिक वेळा भारतीय चौक्‍यांवर गोळीबार आणि तोफगोळ्यांनी मारा केला. यात २१ भारतीयांना प्राण गमवावे लागले.

पाक लष्कराने २००३ च्या शस्त्रसंधीचे पालन करावे, अशी स्पष्ट समज पाकिस्तानला या हल्ल्यांबाबत देण्यात आली. पाकिस्तानने नियंत्रणरेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता राखणे नितांत गरजेचे आहे, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने दिला. सोबतच, पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक शस्त्रसंधीचे सडेतोडपणे प्रत्युत्तर भारतीय लष्कराकडून दिले जात आहे आणि दहशतवाद्यांची घुसखोरीदेखील उधळून लावली जात असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weapon Violation by Pakistan