
‘असनी’ची तीव्रता कमी होण्यास सुरुवात
भुवनेश्वर : बंगालच्या उपसागरातील ‘असनी’ चक्रीवादळाची तीव्रता पूर्व किनाऱ्याजवळ पोचले असून १०५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत असन, वादळाची तीव्रता हळूहळू कमी होण्याचे संकेत आहेत, अशी माहिती हवामान खात्याने दिली. सोमवारी प्रतितास २५ किलोमीटर वेगाने सरकणाऱ्या या चक्रीवादळाची गती मंगळवारी आंध्र प्रदेशातील काकिनाडाच्या आग्नेयेला ३०० किलोमीटर आणि ओडिशातील गोपाळपूरच्या नैऋत्येला ५१० किलोमीटरवर पोचल्यावर प्रतितास पाच किलोमीटरपर्यंत कमी झाली.
मंगळवारी रात्री उशीरा चक्रीवादळ उत्तर-ईशान्य दिशेने पूर्व किनारपट्टीला समांतर दिशेने सरकण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली. भुवनेश्वरमधील प्रादेशिक हवामान खात्याचे संचालक एच.आर.विश्वास म्हणाले, की तीव्र स्वरूपातील ‘असनी’ चक्रीवादळाने वाफ गमावण्यास सुरूवात केली असून येत्या २४ तासांत त्याची तीव्रता आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्री वाऱ्याचा वेग ८० ते ९० किलोमीटर प्रतितास तर बुधवारी संध्याकाळपर्यंत तो ६० ते ७० किलोमीटर प्रतितासपर्यंत कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशातील गंजम, पुरी आणि खुर्दा जिल्ह्यात पाऊस पडत आहे. हवामान खात्याने ओडिशाच्या किनारी भागात येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गंजम जिल्ह्यात प्रशासनाने सर्व समुद्रकिनारे पर्यटकांसाठी बंद केले आहेत. दरम्यान, चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Web Title: Weather Update Asani Cyclone Effect Intensity Began To Decrease
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..