
गुजरातची स्थिती बिकटच!
अहमदाबाद/नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, हरियानातील नागरिक पावसाची वाट पाहत असताना दुसरीकडे गुजरात आणि महाराष्ट्रासारख्या पश्चिमी राज्यांत पावसाने कहर केला आहे. गुजरातमध्ये तर स्थिती गंभीर बनली आहे. नवसारी, डांग, अहमदाबाद, तापी, नर्मदा यासारख्या जिल्ह्यात पुराची स्थिती चिंताजनक बनली आहे. नवसारीहून सुरतला जोडणारा महामार्ग हा पुरामुळे बंद केला आहे. अहमदाबादच्या गल्लोगल्ली पाणी साचले आहे. प्रमुख मार्गालगत उभ्या असलेल्या मोटारी पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक रुग्णालयात गुडघाभर पाणी साचले आहे तर अनेक सोसायटीतील पार्किंगला तळ्याचे स्वरूप आले आहे.
गेल्या चोवीस तासात गुजरातमध्ये पुरामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यात आतापर्यंत ६९ जण मृत्युमुखी पडले आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांनी, संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता सोसायट्या, कॉलनी आणि गावातून २७,८९६ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेल्याचे सांगितले. पूरग्रस्त भागातील १८,२२५ जणांना शिबिरात स्थलांतरित केल्याचे त्यांनी नमूद केले. डांग, नवसारी, तापी, वलसाड सारख्या जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे. याशिवाय पंचमहाल, छोटा उदयपुर, खेडा येथे देखील जनजीवन विस्कळित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा करून पूरस्थितीची माहिती घेतली. पटेल यांनी छोटा उदेपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त बोडेलीची पाहणी केली. तसेच पूरग्रस्त भागाचा हवाई दौरा देखील केला. दक्षिण गुजरातमध्येही पाऊस सुरू आहे.
कच्छ, राजकोटमध्येही पावसाने सोमवार रात्रीपासून हजेरी लावली आहे. मंगळवारी सहा वाजेपर्यंत कच्छ येथील अंजेर तालुक्यात १६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. वलसाड, नवसारी, सुरत, तापी, डांग, नर्मदा, छोटा उदेपूर येथे रेड ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. नवसारी जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नवसारी जिल्ह्यातील ९५०० जणांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.
मध्य प्रदेशात ३३ जिल्ह्यात ऑरेंज ॲलर्ट
मध्य प्रदेशात देखील काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातलगत असलेल्या भागात पाऊस होत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यांना ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे.
केरळ, आंध्रात पाऊस सुरूच
दक्षिण भारतातील राज्यांत देखील पुरामुळे स्थिती गंभीर बनली आहे. आंध्र प्रदेशातील गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने ॲलर्ट जारी केला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. राजमहेंद्रवरम येथील नागरिकांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. केरळमध्ये ऑरेंज ॲलर्ट जारी केला.
Web Title: Weather Update Rain Forcast Monsoon Madhya Pradesh 33 District Orange Alert
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..