वेल डन मालविका!

वेल डन मालविका!
वेल डन मालविका!

दहावी, बारावी नसतानाही अमेरिकेतील "एमआयटी‘त मिळाला प्रवेश
नवी दिल्ली - दहावी, बारावी असे पारंपरिक पद्धतीचे शिक्षण न घेता, आपल्याला आवडणाऱ्या विषयाचा अभ्यास करून मोठे यश मिळविता येते, हे मुंबईतील मालविका जोशी या अवघ्या 17 वर्षांच्या वेगळ्या वाटेने जाणाऱ्या तरुणीने दाखवून दिले आहे. इयत्ता सातवीनंतर कुठल्याही शाळेत न जाता स्वतःच अभ्यास करून कॉम्युटर प्रोग्रामिंगमध्ये गती प्राप्त केलेल्या मालविकाला अमेरिकेतील प्रख्यात मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीने (एमआयटी) प्रवेश दिला आहे. गुणांपेक्षा प्रतिभा महत्त्वाची ठरते हे मालविकाने दाखवून दिले.

दादरमधील पारसी यूथ असेंब्ली शाळेत मालविका चार वर्षांपूर्वी सातवीत शिक्षण घेत होती. सारे काही सुरळीत सुरू असताना मालविकाच्या आईने एक धक्कादायक निर्णय घेतला. मालविकाचा कल ओळखून सुप्रिया यांनी चक्क तिची शाळाच बंद केली. सुप्रिया यांनी एनजीओतील नोकरी सोडून आपल्या दोन्ही मुली, मालविका आणि राधा यांच्या शिक्षणाकडे पूर्णवेळ लक्ष देण्याचा निर्णय घेतला.

काही काळानंतर आपल्याला कॉम्युटर प्रोग्रामिंगमध्ये गती असल्याचे मालविकाच्या ध्यानात आले. या विषयाचा ती सखोल अभ्यास करू लागली. त्यानंतर तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या प्रोग्रामिंग ऑलिंपियाडमध्ये दोन रौप्य आणि एक कांस्यपदक मिळविले. या पदकांमुळेच मालविकासाठी "एमआयटी‘मधील शिक्षणाचे दार उघडले. कारण आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना "एमआयटी‘मध्ये प्रवेश दिला जातो. तीन पदके नावावर असलेल्या मालविकाला "एमआयटी‘ने शिष्यवृत्ती दिली असून, ती तेथे "बीएस्सी‘चे शिक्षण घेत आहे.

जेव्हा मी शाळा सोडून घरीच अभ्यास करू लागले तेव्हा मी अनेक विषयांचा अभ्यास केला. मला कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये रुची वाटू लागली, त्यामुळे मी या विषयावर लक्ष्य केंद्रित केले, असे मालविकाने "पीटीआय‘ला सांगितले. अत्यंत हुशार असलेल्या मालविकाला भारतातील "आयआयटी‘मध्ये प्रवेश नाकारला गेला. कारण "आयआयटी‘ प्रवेशासाठी बारावी उत्तीर्ण असण्याची अट आहे. भारतात फक्त चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटमध्ये मालविकाला एमएस्सीसाठी प्रवेश मिळू शकला. त्याच दरम्यान मालविकाला "एमआयटी‘मध्ये शिक्षण्याची संधी उपलब्ध झाली.

मुलांची आवड समजून घ्या...
सुप्रिया म्हणाल्या, की घरी राहून स्वतःच शिकण्याच्या पद्धतीबद्दल भारतीयांना फारसी माहिती नाही. दहावी व बारावीचे प्रमाणपत्र नसेल, तर आपल्या मुलीचे काय होईल, असा प्रश्न आम्हालाही सुरवातीला पडला होता. मात्र, मी स्वतः माझ्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले. आवडीचा विषय निवडल्यामुळे मालविकाला यश मिळत गेले. त्यामुळे तुमच्या मुलांना नेमके काय आवडते, हे समजून घ्या. परीक्षेतील गुण नव्हे तर तुमच्या मुलांमधील प्रतिभा त्यांना मोठे यश मिळवून देते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com