डान्स करा आणि फिट रहा; जाणून घ्या नवा फिटनेस फंडा

विशाखा गायकवाड, फिटनेस ट्रेनर
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

नृत्य (डान्स) केवळ मनोरंजन नसून, ॲरोबिक व्यायामाचाही तो उत्कृष्ट प्रकार आहे. नृत्यातून मनोरंजन आणि आरोग्य हे दोन्ही हेतू साध्य होतात.

नृत्य (डान्स) केवळ मनोरंजन नसून, ॲरोबिक व्यायामाचाही तो उत्कृष्ट प्रकार आहे. नृत्यातून मनोरंजन आणि आरोग्य हे दोन्ही हेतू साध्य होतात. नृत्यातील विविध हालचालींमुळे शरीर हलके होते; शिवाय मनावरील ताणही कमी होतो. किशोरवयीन मुला-मुलींमधील वाढता लठ्ठपणा पाहता नृत्य हा आनंदातून आरोग्य मिळविण्याचा चांगला पर्याय ठरू शकतो.

शरिरासाठी स्ट्रेचिंग का आहे गरजेचे? जाणून घ्या फायदे

तुम्हीही नृत्य करा
दररोजची शाळा, गृहपाठ, फास्ट फूड आदींमुळे शाळकरी मुलांमध्ये लठ्ठपणा व मानसिक ताणही वाढत आहे. नृत्यातून शारीरिक संतुलन साधतानाच अव्यक्त भावनाही व्यक्त होतात. तुम्हीही चांगले मित्र/मैत्रिणी बनवून नृत्यातून आनंद व आरोग्यप्राप्ती करू शकता. तुम्ही तुमच्या वेळेनुसार नृत्यासह कार्डिओ करून आरोग्य मिळवा. नृत्य नकळतपणे आनंदाने केला जाणारा शारीरिक व्यायाम होऊ शकतो. खेळ व व्यायामशाळेतून (जिम) व्यायाम होतो, तसाच व्यायाम नृत्यामधून होऊ शकतो. बहुतेक नृत्यांगनांनी (डान्सरने) हे मान्य केले आहे, की नृत्य हा एक शारीरिक व्यायामाचाच प्रकार आहे. नृत्यामुळे शारीरिक ताकद वाढते. स्नायू बळकट होऊन अतिशय सुबक अशी लवचिकता निर्माण होते.

नृत्याचे फायदे

  1. शारीरिक ताकद वाढते.
  2. स्नायू बळकट होतात.
  3. लवचिकता वाढते.
  4. मानसिक ताण कमी होतो.

शाळकरी मुलांना योगासनामुळे होऊ शकतात 'हे' फायदे

कोणते नृत्य करावे?
नृत्यात आपण कोणत्या प्रकारचे नृत्य करतो, हे महत्त्वाचे नसते. कोणत्याही नृत्यात आपण प्रत्येक स्नायूचा उपयोग करीत असतो. नृत्याचे काही पारंपरिक प्रकार आहेत. त्यांना लोकनृत्य असे म्हणतात. आपल्या महाराष्ट्रात कोळी, धनगरनृत्य आदी लोकनृत्य आहेत. आषाढी वारीमध्ये वारकरीही टाळ-मृदंगावर ठेका धरतात. पंजाबचे भांगडा नृत्य प्रसिद्ध आहे. लोकनृत्याबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टी, हिपहॉप, तसेच लॅटिन, सालसा व बचाता आदी नृत्यप्रकारात शारीरिक सहनशक्तीची गरज जास्त असते. नृत्यांगना, जलतरणपटू, धावपटू व फुटबॉलपटू यांना ताकदीची अधिक गरज असते. नृत्य एखादी कथा संगीताच्या मदतीने ऐकण्याच्या व पाहण्याच्या माध्यमातून आकर्षक करण्याचे सर्जनशील काम करते. नृत्याची दुसरी बाजू अशी, की त्यातून शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. नृत्य म्हणजे आपल्या मनातील सर्व भावना शारीरिक हावभावांतून प्रकट करणारा एक आविष्कार असतो. म्हणूनच, नृत्य ही एक नुसती कला नाही, तर सुंदर व्यायामप्रकारही आहे. काही नृत्यांगना नृत्य व अॅथलेटिक्सचे एकत्रीकरण करून नृत्याचा नवीन आविष्कार तयार करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wellness dance for fitness tips in marathi