पश्‍चिम बंगालमधील गुन्हेगारीचाही ‘खेला होबे’!

West-Bengal
West-Bengal

नमनालाच ९० उमेदवार कलंकित; ‘एडीआर’ व ‘बंगाल वॉच’ची पाहणी
नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालच्या रमधुमाळीत ‘खेला होबे' ची घोषणा गाजत असली तरी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीवर नजर टाकली तर निवडणुकीच्या नमनाला गुन्हेगारीचाही ‘खेला होबे'' झालाय की काय, असे वातावरण दिसते. कारण पहिल्याच टप्प्यात निवडणुकीच्या फडातील १९१ उमेदवारांपैकी गंभीर व अतिगंभीर गुन्हे दाखल असलेल्या सर्वपक्षीयांची संख्या ९० (४७ टक्के) इतकी आहे. 

लोकशाही सुधारणांबाबतची एडीआर संस्था व ‘बंगाल निवडणूक वॉच’च्या वतीने केलेल्या या अभ्यास पाहणीत या टप्प्यातील उमेदवारांपैकी ४८ जणांवर गंभीर व ४२ जणांवर अतीगंभीर गुन्हे दाखल असल्याची कबुली त्यांनीच निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांत माकपच्या १८ पैकी १० (५६ टक्के), भाजपच्या २९ पैकी १२ (४१), तृणमूल कॉंग्रेसच्या २९ पैकी १० (३५ टक्के) व कॉंग्रेसच्या ६ पैकी २(३३ टक्के) उमेदवारांचा समावेश आहे. अतीगंभीर गुन्हे दाखल झालेल्यांत माकपच्या ९ (५० टक्के) , भाजपच्या ८(२८ टक्के ), तृणमूलच्या व कॉंग्रेसच्या प्रत्येकी एकेका उमेदवारांचा (१७ टक्के व ९ टक्के)) समावेश आहे. बसपाचे २ उमेदवारही यात आहेत. याशिवाय महिलांच्या बाबतीतले बलात्कार, अपहरण,आदी गुन्हे नोंद असणाऱ्या उमेदवारांची संख्या या टप्प्यात १२ आहे.

खून व खुनाचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या २७ इतकी आहे. सर्वपक्षांनीच गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या २५ टक्के उमेदवारांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातल्याने, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी १३ फेब्रुवारीला राजकारणातील गुन्हेगारी घटविण्याबाबत केलेल्या निर्देशांचा फारसा परिणाम न झाल्याचेही उघड आहे. मुख्य पक्षांचे ३३ ते ५६ टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. या टप्प्यात संवेदनशील म्हणजे रेड अलर्ट जाहीर झालेले ७ (२३ टक्के) मतदारसंघ आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुर्शिदाबाद, माल्डा हा संवेदनशील भाग
निवडणुकीच्या ८ टप्प्यांपैकी ही फक्त पाहिल्या टप्प्यातील उमेदवारांची छाननी आहे. यापुढे मुर्शिदाबाद आणि माल्डा यासह बंगालच्या अति संवेदनशील भागातील उमेदवारांच्या पाश्‍र्वभूमीची छाननी बाकी आहे. हे दोनच जिल्हे भारतातील ७१८ पैकी सर्वात जास्त गुन्हेगारी आणि हिंसाचार होणारे जिल्हे आहेत असे ‘एनआयए’ नेच जाहीर केले आहे. दोन्ही जिल्ह्यात ‘अल कायदा’ने मजबूत बस्तान बसविले असून बांगलादेश, प. बंगाल, आसाम व झारखंडच्या काही भागासह ग्रेटर बांगलादेशाच्या निर्मितीची हाक आणि त्या भागात मिळणारा प्रतिसाद ही राष्ट्रीय चिंतेची बाब आहे, असे निरीक्षणही राष्ट्रीय तपास संस्थेने नोंदवले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com