पश्‍चिम बंगालमध्ये सातपैकी चार पालिका तृणमूलकडे

पीटीआय
गुरुवार, 18 मे 2017

सातपैकी सर्वाधिक मतदान पुजाली येथे 79.6 टक्के, तर दार्जिलिंगमध्ये सर्वात कमी 52 टक्के मतदान झाले होते. मुर्शिदाबाद जिल्ह्यात डोमकल पालिका निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसने 21 पैकी 18 जागा जिंकल्या

कोलकता - पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची लाट अद्याप कायम आहे. तृणमूल कॉंग्रेसने सातपैकी चार नगरपालिकांमध्ये विजय मिळवलेला असताना दुसरीकडे दार्जिलिंग, कुर्सियांग आणि कलिम्पोंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) यांच्याशी आघाडी असलेल्या भाजपने विजय नोंदवला आहे. टीएमसीने पुजाली, मिरिक, रायगंज आणि डोमकल येथे झेंडा फडकवला आहे.

मिरिक नगरपालिकेत तृणमूल कॉंग्रेसने 9 पैकी 6 वॉर्ड ताब्यात घेतले आहेत. जीजेएमला तीन वॉर्ड मिळाले आहेत. या ठिकाणी चौदा मे रोजी 68 टक्के मतदान झाले होते. सातपैकी सर्वाधिक मतदान पुजाली येथे 79.6 टक्के, तर दार्जिलिंगमध्ये सर्वात कमी 52 टक्के मतदान झाले होते. मुर्शिदाबाद जिल्ह्यात डोमकल पालिका निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसने 21 पैकी 18 जागा जिंकल्या. कॉंग्रेसकडे केवळ एक, तर सीपीआय (एम)कडे दोनच जागा आल्या. रायगंज पालिकेत टीएमसीला 27 पैकी 14 जागा मिळाल्या. सीपीआयएम- कॉंग्रेसच्या खात्यात 2, तर भाजपच्या खात्यात एकच वॉर्ड आला आहे. पुजालीत तृणमूलला 16 पैकी 12 वॉर्डमध्ये विजय मिळाला, तर भाजप, सीपीआयएमला प्रत्येकी एक- एक वॉर्ड मिळाला आहे. दार्जिलिंगमध्ये जीजेएम आघाडीला 32 पैकी 31 जागा मिळाल्या असून, तृणमूलला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.

कुर्सियांग पालिकेत जीजेएमला 17 जागा, तर टीएमसीला तीन जागा मिळाल्या आहेत. कलिम्पोंग येथे गोरखा फ्रंटला 23 पैकी 19, तर टीएमसीला 2 जागा मिळाल्या. हरका बहादूर छेत्री यांच्या जन आंदोलन पक्षाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

सात महापालिका निवडणूक
एकूण जागा 148
जीजेएम + भाजप ः 72 (भाजपला 3 जागा)
तृणमूल कॉंग्रेस : 68
कॉंग्रेस आणि डावी आघाडी : 4
जनाधिकार पक्ष : 2
अन्य : 1

Web Title: West Bengal civic polls: Trinamool Congress wins 4 municipalities